अर्थसंकल्पीय अधिवेशन बेळगावात भरवा
सभापती होरट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
बेळगाव : अर्थसंकल्पीय अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णविधानसौधमध्ये भरविण्याचा सल्ला विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सोमवारी एक पत्र पाठविले असून अर्थसंकल्पीय अधिवेशन बेळगावात भरविण्याचा ऐतिहासिक निर्णय का घेऊ नये? या माध्यमातून प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी का पुढाकार घेऊ नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी सभापती होरट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. दोनवेळा मुख्यमंत्री पदावरून विकासाला गती देणारे प्रशासन तुम्ही चालविले आहे. कर्नाटकाच्या राजकीय इतिहासात अधिकवेळ मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा इतिहासही निर्माण केला आहे, असे सांगत सभापतींनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. प्रादेशिक असमानता दूर झाली तरच अखंड कर्नाटकाचा विकास शक्य आहे, हे आपले मत आहे.
मोठ्या प्रमाणात अनुदान मिळूनही प्रादेशिक असमानता दूर करण्याची प्रक्रिया दुर्बल झाल्याची टीका केली जात आहे. डॉ. डी. एम. नंजुंडप्पा अहवाल व प्रा. एम. गोविंदराव अहवालानंतरही सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास साधता आला नाही. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील नागरिकांचेही समाधान झाले नाही. विकासाला पूरक अशा क्रिया योजनांच्या माध्यमातून प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी सविस्तर योजना राबविणे आपल्यासारख्या खमक्या मुख्यमंत्र्यांकडून शक्य आहे. असे सांगतानाच प्रथमच सुवर्णविधानसौधमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन भरवून नव्या वर्षात उत्तर कर्नाटकातील नागरिकांना विशेष भेट द्यावी. या परिसरातील नागरिकांच्या मनात कायमस्वरुपी राहण्याचा इतिहास निर्माण करण्यासंबंधी आपण आवश्यक पावले उचलावीत, असेही बसवराज होरट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.