विंडीजच्या पहिल्या डावात हॉजचे अर्धशतक
पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा : विंडीज 3 बाद 194
वृत्तसंस्था, टेरोबा (त्रिनिदाद)
येथे शनिवारपासून सुरु झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळे केवळ 67 षटकांचा खेळ झाला आणि विंडीजने पहिल्या डावात 3 बाद 194 धावा जमविल्या. कॅव्हेम हॉजच्या अर्धशतकामुळे विंडीजचा डाव सावरला.
पाकचा संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळाच्या पहिल्या सत्रात केवळ 14.1 षटकांचा खेळ झाला आणि विंडीजने 1 बाद 23 धावा जमविल्या होत्या. नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पाकच्या मोहम्मद अब्बासने ब्रेंडॉन किंगचा त्रिफळा उडविला. त्याने 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. पावसामुळे पुन्हा खेळ थांबविण्यात आला. उपाहारावेळी चंद्रपॉल 5 तर हॉज 5 धावांवर खेळत होते.
उपाहारानंतर चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात विंडीजने 43 षटकात 3 बाद 127 धावांपर्यंत मजल मारली होती. या सत्रामध्ये विंडीजने 2 गडी गमविताना 104 धावांची भर घातली. हॉज आणि चंद्रपॉल या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली. अमीर जमालने चंद्रपॉलला सलमान आगाकरवी झेलबाद केले. त्याने 77 चेंडूत 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. चहापानापूर्वी विंडीजचा आणखी एक फलंदाज आमीर जंगू मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. आमीर जंगूने 32 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा जमविताना हॉजसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भर घातली. या सत्रामध्ये हॉजने आपले अर्धशतक 86 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने झळकविले. चहापानावेळी हॉज 56 तर शाय होप 39 धावांवर खेळत होते.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये विंडीजने एकही गडी न गमविता 67 धावा जमविल्या. होप आणि हॉज या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 88 धावांची भागिदारी केली. हॉज 83 तर होप 39 धावांवर खेळत होते. पाकतर्फे मोहम्मद अब्बासने 44 धावांत 2 तर खुर्रम शेहजादने 1 गडी बाद केला. या कसोटीत पाक संघातर्फे डावखुरा फिरकी गोलंदाज 33 वर्षीय उस्मान अली कसोटी पदार्पण करीत आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी केवळ 67 षटकांचा खेळ झाला तर 23 षटकांचा खेळ वाया गेला.
सोबर्स यांना श्रद्धांजली
ही पहिली कसोटी ब्रायन लारा क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविली जात आहे. कसोटी सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी प्रत्यक्ष खेळाला प्रारंभ होण्यापूर्वी मैदानात विंडीजचे माजी महान क्रिकेटपटू अष्टपैलू गारफिल्ड सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली. या दोन्ही संघातील खेळाडूंनी दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात प्रवेश केला. या मैदानावरील ही 13 वी कसोटी आहे.
संक्षिप्त धावफलक - विंडीज प. डाव 67 षटकात 3 बाद 194 (हॉज खेळत आहे 83, चंद्रपॉल 21, किंग 12, जंगू 21, होप खेळत आहे 39, मोहम्मद अब्बास 2-44, आमीर जमाल 1-54).