For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेशिस्तीच्या मुद्यांवरून हॉकीपटू मनप्रीतसह तिघांना डच्चू

06:22 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेशिस्तीच्या मुद्यांवरून हॉकीपटू मनप्रीतसह तिघांना डच्चू
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हॉकी इंडियाने अनुभवी मिडफिल्डर मनप्रीत सिंगसह तीन खेळाडूंना आगामी एफआयएच प्रो-लीग हंगामासाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान घडलेल्या बेशिस्तीच्या मुद्यांवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान बेशिस्तीच्या बाबतीत एक गंभीर प्रकार समोर आला होता. त्यानंतर मनप्रीत, दिलप्रीत सिंग आणि गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक यांना संभाव्य खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. भारताने 2 ते 16 डिसेंबरदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, जिथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 2-0 ने पराभव पत्करावा लागला होता, तर तिसरा सामना अनिर्णित राहिला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान अनुशासनाचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला, ज्यात चौथ्या खेळाडूचाही समावेश होता. त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. या खेळाडूंनी नंतर आपल्या सहकाऱ्याला प्रतिबंधित पदार्थ दिल्याबद्दल माफी मागितली, परंतु आगामी शिबिरातून त्यांना वगळण्याचा निर्णय संघाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला, असे संघातील एका सूत्राने सांगितले.

Advertisement

हॉकी इंडियाने गुऊवारी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली, ज्यात माजी कर्णधार मनप्रीतच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रो-लीग हंगामाला पुढील महिन्यात रूरकेला येथे सुऊवात होणार आहे. मनप्रीतने रांची रॉयल्स संघाचे सहकर्णधारपद भूषवत संघाला हॉकी इंडिया लीगच्या अंतिम फेरीत पोहोचविले होते आणि या स्पर्धेतील त्याची कामगिरी कौतुकास्पद होती.

दोन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघांचा सदस्य राहिलेला 33 वर्षीय मनप्रीत 15 वर्षांत प्रथमच शिबिरासाठीच्या (1 ते 7 फेब्रुवारी) संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. 412 सामन्यांसह सर्वाधिक सामने खेळणारा भारतीय खेळाडू बनण्यापासून तो फक्त एक सामना दूर आहे. हा विक्रम सध्या हॉकी इंडियाचे विद्यमान अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या नावावर आहे. एफआयएच प्रो लीगचा भारतीय टप्पा 10 ते 15 फेब्रुवारीदरम्यान ररकेला येथे होणार आहे. भारत आपला पहिला सामना 11 फेब्रुवारी रोजी अर्जेंटिनाविऊद्ध खेळणार आहे.

Advertisement
Tags :

.