हॉकी इंडिया लीगचे सात वर्षानंतर पुनरागमन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तब्बल 7 वर्षानंतर हॉकी इंडियाच्या लीग स्पर्धेचे डिसेंबरमध्ये पुनरागमन होत आहे. हॉक इंडिया लीग स्पर्धा पुरुष आणि महिलांच्या अशा दोन विभागात नव्या पद्धतीने 28 डिसेंबरपासून खेळविली जाणार आहे.
पुरुषांच्या विभागात एकूण 8 संघांचा तर महिलांच्या विभागात 6 संघांचा समावेश राहिल. हॉकी इंडिया लीग स्पर्धा पहिल्यांदाच महिलांसाठी यावेळी खेळविली जात आहे. सदर स्पर्धा दोन शहरांमध्ये होणार आहे. पुरुषांची हॉकी इंडिया लीग स्पर्धा राऊरकेला येथे तर महिलांची स्पर्धा रांचीमध्ये 28 डिसेंबरपासून चालु होईल. ही स्पर्धा 1 फेब्रुवारीला समाप्त होईल. या स्पर्धेसाठी हॉकीपटूंचा लिलाव 13 ते 15 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. या लिलावावेळी एकूण 10 संघांचे फ्रांचायझी उपस्थित राहतील. हॉकीपटूंचा लिलाव 3 विभागात 2 लाख, 5 लाख आणि 10 लाख रुपयांच्या बोलीवर केला जाईल. देशातील महिला हॉकीला अधिक प्रोत्साहन मिळण्याच्या हेतुने हॉकी इंडिया लीगचे यावर्षी पुनरागमन होत आहे.
पुरुषांच्याविभागात चेन्नई संघाचे चार्लस ग्रुप, लखनौ संघाचे येदु स्पोर्ट्स, पंजाब संघाचे जेएसडब्ल्यु स्पोर्ट्स, पश्चिम बंगाल संघाचे शिराची स्पोर्ट्स, दिल्ली संघाचे एस.जी. स्पोर्ट्स आणि एन्टरटेनमेंटचे मालक तसेच भारताचे टेनिसपटू महेश भूपती, ओदीशा संघाचे वेदांत लि., हैद्राबाद संघाचे रिसोल्युट स्पोर्ट्स आणि रांची संघाचे नेओयाम स्पोर्ट्स व्हेंचर प्रा. लि. हे फ्रांचायझी आहेत. महिलांच्या विभागात हरियाणा संघाचे जेएसडब्ल्यु स्पोर्ट्स, पश्चिम बंगाल संघाचे शेराची स्पोर्ट्स, दिल्ली संघाचे एस. जी. स्पोर्स्ट्स, ओदीशा संघाचे नेओयाम स्पोर्ट्स व्हेंचर प्रा.लि. हे फ्रांचायझी असून उर्वरित दोन संघाचे फ्रांचायझी लवकरच जाहीर केले जातील.
प्रत्येकी संघाच्या फ्रांचायझीकडे 24 हॉकीपटू राहतील. त्यामध्ये किमान 16 भारतीय हॉकीपटूंचा समावेश राहिल. 8 विदेशी हॉकीपटूंना संधी मिळेल. महिलांची हॉकी लीग स्पर्धेतील अंतिम सामना 26 जानेवारी 2025 ला रांचीमध्ये तर पुरुषांच्या विभागातील अंतिम सामने 1 फेब्रुवारीला राऊरकेला येथे खेळविला जाईल. त्याच प्रमाणे ओदीशा शासनाने हॉकी इंडियाबरोबर 2036 पर्यंत आपल्या पुरस्कार करारामध्ये वाढ केल्याचे हॉकी इंडियाचे प्रमुख दिलीप तिर्की यांनी सांगितले.