हॉकी सीईओ इलिना नॉर्मनचा राजीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे सीईओ हे पद भूषविणारी इलिना नॉर्मनने आपल्या प्रमुख कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आहे. सदर माहिती हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे. अलिकडच्या कालावधित हॉकी इंडियाच्या कार्यकरणी समितीत सर्रास गटबजी निर्माण झाल्याने या समस्येला कंटाळून आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे नॉर्मन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या इलेना नॉर्मन यांनी हॉकी इंडियाच्या सीईओ पदाची जबाबदारी जवळपास 13 वर्षे सांभाळली होती. गेल्या 3 महिन्यांच्या कालावधित त्यांना हॉकी इंडियाकडून मानधनही मिळाले नसल्याचे विश्वसनिय गोटातून सांगण्यात आले. तसेच मानधन व गटबाजी या समस्येला सामोरे जाताना नॉर्मन यांना खूपच अवघड गेले. दरम्यान नॉर्मन यांनी कोणतेही कारण नमूद न करताना आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे हॉकी इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून हॉकी इंडियामध्ये दोन गट पडले आहेत. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांचा एक गट तर सचिव भोलानाथ सिंग यांचा दुसरा गट आहे. या दोन गटांमध्ये सध्या जोरदार मतभेद होत आहेत. यापूर्वी भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जेनेकी स्कोपमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यानंतर इलिना नॉर्मन यांनी आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देऊन हॉकी इंडियाला दुसरा धक्का दिला आहे.