एचएमडी ग्लोबल भारतातच निर्मितीवर देणार भर
नोकिया फोन्स बनवते कंपनी : चीनमधून पडणार बाहेर
नवी दिल्ली : नोकिया ब्रँडेड फोन-स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल आता आपले निर्मिती कारखाने भारतामध्ये स्थलांतरित करणार असल्याची माहिती आहे. चीनमधील बाजारामधून बाहेर पडण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीने नजिकच्या काळामध्ये भारतातच स्मार्टफोन निर्मिती कारखाने उभारण्याचे निश्चित केले आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारासंदर्भातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एचएमडी ग्लोबल कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सध्याला जागतिक स्तरावर सर्वत्र अस्थिर भू राजकीय परिस्थिती दिसून येते आहे. परिणामी भारत हा बाहेरच्या कंपन्यांसाठी आकर्षक असा देश ठरतो आहे. भारताने विदेशी कंपन्यांकरीता पीएलआय ही योजना आणलेली आहे. कंपनीने भारतातच इलेक्ट्रॉनिकचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांबरोबर चर्चाही सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.
भारतातून निर्यात वाढवणार
चीनमधून निर्यात करण्यात येणाऱ्या उत्पादनांची संख्या आता कमी करण्यात आली आहे. या तुलनेमध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांची संख्या वाढताना दिसते आहे. एचएमडी ग्लोबल सध्याला नोकियाचे फोन व स्मार्टफोन्स पश्चिम आशिया आणि आफ्रिका यासारख्या देशांना भारतातून पाठवते आहे. आगामी काळात अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात वाढीसाठी कंपनी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.