For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिटलरच्या घरात आता पोलीस स्थानक

06:10 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिटलरच्या घरात आता पोलीस स्थानक
Advertisement

जगातील सर्वात कुख्यात हुकुमशहांपैकी एक एडोल्फ हिटलरचा जन्म ज्या घरात झाला होता, तेथे आता पोलीस स्थानक सुरू करण्यात आले आहे. पहिल्या नजरेत हा निर्णय अजब वाटू शकतो, परंतु यामागे एक मोठे कारण दडलेले आहे. ही इमारत नव-नाझी विचारसरणीला मानणाऱ्या लोकांसाठी श्रद्धा किंवा एकत्र येण्याचे ठिकाण ठरू नये अशी ऑस्ट्रियाच्या सरकारची इच्छा होती. याचमुळे या ऐतिहासिक इमारतीला पोलीस स्थानकात रुपांतरित करण्यात आले आहे.

Advertisement

ऑस्ट्रियाच्या ब्राउनाउ एम इन शहरात अस्तित्वात असलेल्या 17 व्या शतकातील या इमारतीचे अधिकृत स्वरुपात जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या रुपात उद्घाटन करण्यात आले आहे. दीर्घकाळापर्यंत याच्या दुरुस्ती अन् बदलाचे काम चालले, ज्यानंतर आता येथे पोलिसांचे संचालन सुरू झाले आहे.

हिटलरचे जन्मस्थळ असलेली ही इमारत 2011 पासून रिकामी होती. नंतर या संपत्तीचे मालक आणि ऑस्ट्रियन सरकार दरम्यान वाद झाला. अखेर सरकारने या इमारतीचे अधिग्रहण केले आहे. यानंतर तज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली, या समितीने या इमारतीच्या भविष्यावरून सरकारला शिफारसी केल्या होत्या. एखादे शासकीय कार्यालय किंवा सामाजिक कार्याशी निगडित संस्था येथे स्थापन करण्यात यावी असे समितीचे मानणे होते.

Advertisement

जर या इमारतीला संग्रहालय करण्यात आले, तरी देखील हे नियो-नाझी विचारसरणीच्या समर्थकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. म्हणजेच संग्रहालयाचा उद्देश इतिहास सांगणे असला तरी तेथे कट्टरवादी लोक पोहोचण्याचा धोका कायम राहिला असता असे तज्ञांचे सांगणे होते. तर इमारतीला पूर्णपणे पाडविण्यासही विरोध करण्यात आला, कारण यामुळे इतिहासाशी निगडित एक महत्त्वपूर्ण स्थान कायमस्वरुपी नष्ट झाले असते.

इमारतीच्या बाहेरील हिस्स्याला आता पूर्णपणे नवे रुप देण्यात आले आहे. परंतु याच्या बाहेर लावलेले स्मारक दगड आजही तेथे आहे, यावर शांतता, स्वातंत्र्य अन् लोकशाहीसाटी फॅसिस्टवाद पुन्हा कधी नाही असे लिहिलेले आहे. लाखो लोकांचा मृत्यू याची आठवण आम्हाला करून देतो. फॅसिस्टवाद आणि द्वेषाच्या राजकारणाने मानवी इतिहासाला किती मोठे नुकसान पोहोचविले होते याचा संदेश हा जगाला देतो.

एडोल्फ हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला होता, परंतु तो नंतर जर्मनीचा हुकुमशहा झाला होता. त्याने ऑस्ट्रियाला जर्मनीत सामील करविण्याचे समर्थन केले अणि 1938 मध्ये हे लक्ष्यही पूर्ण केले होते. आता त्याच हिटलरच्या जन्मस्थानाला पोलीस स्थानकात रुपांतरित करत ऑस्ट्रियाने इतिहास मिटविला जाऊ शकत नाही, परंतु त्याला द्वेष फैलावणाऱ्यांचे प्रतीकही होऊ दिले जाऊ नये असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement
Tags :

.