हितेश, सचिन, मिनाक्षी यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था / अॅस्टेना (कझाकस्थान)
2025 च्या येथे सुरू असलेल्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत हितेश गुलीया आणि सचिन सिवाच यांनी शानदार विजयाने आपल्या मोहीमेला प्रारंभ केला आहे. सोमवारी येथे झालेल्या पहिल्याच फेरीतील लढतीत हितेश आणि सचिन यांनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळविला. महिलांच्या विभागात मिनाक्षी आणि मुस्कान यांनी विजय नोंदविले.
पुरुषांच्या लाईट मिडेल वेट गटातील प्राथमिक फेरीच्या पहिल्या लढतीत हितेश गुलीयाने चीन तैपेईच्या ऑलिम्पिक मुष्टीयोद्धा केन वेईचा 5-0 अशा गुणांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. हितेशने ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेतील टप्प्यात सुवर्णपदक मिळविले होते.
पुरुषांच्या लाईट वेट गटातील पहिल्या लढतीत सचिन सिवाचने कॅनडाया अल अहमदी केवोमा अलीचा 5-0 असा फडशा पाडला. महिलांच्या विभागात भारताच्या मिनाक्षीने लाईट फ्लायवेट गटात विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या मॅडेलिने बोवेनचा 5-0 तसेच महिलांच्या मिडल वेट गटातील लढतीत भारताच्या मुस्कानने इंग्लंडच्या केरी डेव्हीसचा 3-2 अशा गुण फरकाने पराभव केला. विश्व चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेतील कझाकस्थानचा टप्पा 7 जुलैपर्यंत राहील. या स्पर्धेत 31 देशांचे सुमारे 400 स्पर्धक सहभागी झाले असून पुरुष आणि महिलांच्या विभागात 10 विविध वजन गटात लढती होत आहेत. या स्पर्धेच्या भारताने 20 सदस्यांचा संघ पाठविला आहे. ब्राझीलमध्ये यापूर्वी झालेल्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने सहा पदकांची कमाई केली होती. आता विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेतील अंतिम टप्पा येत्या नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्लीत होत आहे.
विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनतर्फे अलिकडेच पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या इलाईट स्तरावरील आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण 6 पदके मिळविली होती.