Sangli News : सांगलीत 'हिट ॲण्ड रन'चा थरार; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
टिळक चौकात जमावाने अडकवला बेधुंद कार चालक
सांगली : नशेत धुंद कार चालकाने बेदरकार वाहन चालवत चार पोलिसांसह अकरा जणांना उडवले. पटेल चौक ते गणपती मंदिर आणि टिळक चौक या टप्प्यात दहा ते बारा मिनिटांत असंख्य वाहनांना थडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. टिळक चौकात दुचाकी आडवी आल्याने कार थांबली, आणि बेधुंद कार चालकास जमावाने चोपत पोलिसांच्या हवाली केले. 'हिट अँड रन च्या या थरारत जीवत हानी टळली. रविवारी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेत पोलीस अंमलदार माया चव्हाण, सपना गराडे, वाहतूक शाखेचे अंमलदार लखन होवाळे, सुभद्रा निसरट यांच्यासह महेंद्र प्रताप पवार (वय १४, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली), पूर्वीसुनील फराटे (२३), वदन सुनील फराटे (३), अनुष्का विनायक फराटे (१७, रा. गवळी गल्ली), उमा विद्याधर नार्वेकर (५०, रा. गावभाग), स्वप्नील शिवगोंडा पाटील (३० रा. मिरज) अशी जखमी झाले आहे. कारचालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (२६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) जखमी आहे. सर्व जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज रविवारीची सुटी आहे. त्यामुळे खरेदी आणि फिरायला येणाऱ्यांची मोठी गर्दी पेठेत होती.घाटावर कृष्णामाई महोत्सव देखील सुरु असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती. रात्री पावणे आठच्या सुमारास पांचाळ कार (एमएच १४ सीबी ४९००) घेऊन निघाला होता. मद्यधुंद अवस्थेत तो पटेल चौकात भरधाव वेगाने आला. त्याने अनेकांना घडक दिल्या. नागरिकांनी पाठलाग सुरू केल्याने त्याने गाडीचा वेग वाढवला. या धावपळीत आणखी अनेकांना कारची धडक बसली.
पटेल चौक, गणपती पेठेतून तो टिळक चौकातून पळून जाण्याच्या तयारीत होता.टिळक चौकात मोठी गर्दी होती. समोर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुभद्रा निसरट आणि उपनिरीक्षक अविनाश घोरपडे हे वाहतूक नियमन करत होते. तो भरधाव वेगाने येताना पाहताच अडवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने निसरट यांनाही धडक दिली. त्यानंतर टिळक चौकात एका दुचाकी चालकाने घडक दिल्याने त्याची गाडी थांबली. यावेळी जमावाने त्याला गाडीतून खाली खेचत चांगलाच चोपून काढला. गाडीच्या काचाही फोडण्यात आला. पोलिसांनी त्या चालकाना ताब्यात घेतले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. हिट अँड रनचा या थरारात कोणाचाही जीव गेला नाही, हे सुदैव.
घटनास्थळी शहरचे निरीक्षक अरूण सुगांवकर, वाहतूकचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पथक दाखल झाले. तातडीने वाहतूक सुरळीत करण्यात करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
वाहतूकीची कोंडी
घटनेनंतर पटेल चौक, कापडपेठ, सराफ पेठ, हरभट रस्ता परिसरात वाहतूकीचा चक्का जाम झाला होता. तासभर वाहने खोळंबली होती. वाहतूक कोडींने नागरिक हैराण झाले होते. पटेल चौकातून टिळक चौकात जाण्यासाठी तब्बल अर्धा तास लोकांना वेळ लागला. रात्री नऊनंतर वाहतूक सुरळीत
करण्यात आली.
व्हिडिओ व्हायरल
हिट अँड रनचा थरार अनेकांना मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध केला. त्यानंतर क्षणात त्याचे व्हिडिओ आणि काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यात काही अफवांचे पिकही सुरू झाले. मात्र, पोलिसांनी तातडीने सर्व सुरळीत केले.
मरण समोर होतं..!
टिळक चौकात बंदोबस्तासाठी उभे असणारे उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांनी हा थरार डोळ्यांनी पाहिला. ते म्हणाले, टिळक चौकात मी वाहतूक नियमनासाठी उभा होता. मागील बाजूल वाहतूक खोळंबल्याने मी तिकडे गेलो. तेवढ्यात मोठा आवाज आला. काही मिनिटे मी तेथून बाजूला झालो होतो अन्यथा माझ्या अंगावरच गाडी आली असतील. आमच्या अंमलदार महिला मात्र या जखमी झाल्या आहेत. मरण मी डोळ्यासमोर पाहिले.