शतक मारा, हेअर ड्रायर मिळवा
पाकिस्तान क्रिकेट लीगमधील प्रकार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतात सध्या आयपीएलची हवा पहायला मिळत आहे. आयपीएल सुरु होऊन आता बरेच दिवस झाले असले तरू उत्साह मात्र कायम असल्याचा दिसत आहे. सध्या अजून एका लीगची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे पाकिस्तान सुपर लीग. सोमवारी पीएसएलमधील तिसऱ्या सामन्यात, जेम्स विन्सच्या शतकामुळे कराची किंग्जने मुलतान सुलतान्सविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. त्याने 43 चेंडूत 101 धावांची जलद खेळी केली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या शानदार खेळीसाठी, कराची किंग्जने त्याला बक्षीस म्हणून एक हेअर ड्रायर दिला, जो या लीगचा घसरता दर्जा दर्शवितो.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये शतक झळकावल्याबद्दल जेम्स विन्सला ‘प्लेअर ऑफ द मॅच‘ म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर, कराची किंग्जने ड्रेसिंग रूममध्ये त्याला बक्षीस म्हणून हेअर ड्रायर देऊन त्याचा सन्मान केला. हे बक्षीस पाहून विन्सलाही हसू आले आणि त्याचा हा क्षण कराची किंग्जने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. व्हिडिओसोबत किंग्जने लिहिले की, मुल्तान सुलतान्सविरुद्धच्या शानदार खेळीसाठी विन्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, हा पुरस्कार पाहिल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली.