प्रश्नपत्रिका फुटण्याचा इतिहास
भारतात गेल्या 25 वर्षांमध्ये महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटींचे 50 हून अधिक प्रकार घडले आहेत. ते घडले, तेव्हा ना दगडफेक झाली, ना लाठीमार झाला, ना कोणत्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला. सध्या दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी नामक संघटनेने, 3 मे 2026 या दिवशी झालेल्या ‘नीट-युजी’ परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संदर्भात आंदोलन चालविले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. या मागणीसाठी 20 जुलैला संसदेवर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात लाठीमार केला. सोनम वांगचुक हे लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि नेते या आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी गेल्या 27 दिवसांपासून उपोषण चालविले आहे. ते सध्या मेदांता रुग्णालयात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त केले, असा आरोपही होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील गेल्या 25 वर्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीचा इतिहास माहीत करुन घेणे योग्य ठरेल. या संबंधीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गंभीर बाबींचा परिचय झाल्याशिवाय रहात नाही. जणूकाही भारतात यावेळी प्रथमच प्रश्नपत्रिका फुटली आहे, अशा आविर्भावात बरेच राजकीय नेते बोलत आहेत. त्यामुळे काही लोकांचाही, हा प्रकार प्रथमच घडला आहे, असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रश्नपत्रिका फुटीचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्वीपासून, अर्थात, पन्नास-साठ वर्षे किंवा त्यांच्याही पूर्वीपासून हे प्रकार होत आहेत. 2004 ते 2014 या काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारच्या कार्यकाळावर दृष्टीक्षेप केला, तरी महत्त्वाच्या आणि देशव्यापी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. 2004 मध्ये सीबीएसईच्या प्रीमेडिकल प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती. त्याचप्रमाणे 2006 मध्ये ‘एम्स’ या सरकारी संस्थेने घेतलेल्या प्रीपीजी मेडिकल परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती. 2007 मध्ये ऑल इंडिया इंsिजनिअरिंग एन्ट्रन्स एक्झामिनेशन (एआयईएए) ची प्रश्नपत्रिका, 2008 मध्ये देशस्तरीय आणि राज्य स्तरीय प्री मेडिकल टेस्ट (पीएमटी) ची प्रश्नपत्रिका, 2011 मध्ये एआयईईई उत्तर प्रदेश, एआयपीएमटी आणि सीबीएसई (12 वी) या प्रश्नपत्रिका, 2012 मध्ये ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस इन्स्टिट्यूट (एम्स) प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका, 2013 मध्ये एसएससी सीजीएल टायर 1 परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि 2014 मध्ये सीबीएसई 12 वीच्या परीक्षेच्या काही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या होता. या सर्व परीक्षा महत्त्वाच्याच होत्या. तसेच त्या राष्ट्रीय पातळीवरच्या होत्या आणि त्यांना लक्षावधी विद्यार्थी बसलेले होते. याशिवाय, राज्यस्तरीय परीक्षांच्या, नोकर भरती परीक्षांच्या आणि प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिका किमान 7 वेळा, वर्ष 2006, 2009, 2010 आणि 2013 या वर्षांमध्ये फुटल्या होत्या. 2006 मध्ये राजस्थानात (तेव्हा राजस्थानात काँग्रेसचे सरकार होते) प्री मेडिकल प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती. स्वारस्यपूर्ण बाब अशी की, आज केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुटुन पडलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी राजस्थानातील मेडिकल प्रवेश प्रश्नपत्रिकाफुटीविषयी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, ती महत्त्वाची आहे. ‘प्रश्नपत्रिका फुटीचा प्रश्न साऱ्या देशभर आहे. यासंबंधी काही ठोस करण्याची आवश्यकता आहे. कितीही प्रयत्न केले, तरी असे प्रकार घडतात,’ अशा अर्थाची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली असून ती युट्यूबवर पहावयास मिळते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, हे सर्व आणि अन्यही प्रश्नपत्रिकाफुटीचे प्रकार सध्या जे पक्ष विरोधात आहेत, यांच्या सरकारांच्या काळात घडले होते. तथापि, एकाही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता. पण, आता निकष वेगळा आहे. गोलपोस्ट बदलले गेले आहे. कारण आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील (विरोधी पक्षांना प्रारंभापासूनच नको असणारे) सरकार आहे. या सरकारने सारेकाही 100 टक्के बिनचूकच केले पाहिजे. तसे केले नाही तर तो ‘लोकशाहीचा संकोच’ ठरणार आहे. हे जे प्रश्नपत्रिकाफुटीचे प्रकार विरोधी पक्षांची सरकारे असताना झाले, ते लोकशाहीचा विकास करणारे होते. भारताची शिक्षण व्यवस्था भक्कम करणारे होते. त्याचवेळी भारतात खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ होते. मात्र, तसाच काही प्रकार चुकुन जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात घडला, तर मात्र, तो लोकशाहीवर कुठाराघात ठरणार आहे. लोकशाहीची गळचेपी करणारा ठरणार आहे. कारण एकच, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. या सरकारला क्षमा नाही. ज्या विरोधकांना जनतेने गेल्या 10-12 वर्षांमध्ये वारंवार नाकारले, ते आणि त्यांच्या पठडीतले कथित विचारवंत, पत्रकार आणि इतर क्षेत्रातले काही मान्यवर (जे त्यावेळी तोंडात मिठाची गुळणी धरुन गप्प होते) आज मात्र अंगात आल्यासारखे उड्या मारत आहेत. कारण एकच, आज या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातले सरकार आहे