ऐतिहासिक स्थळे अधिसूचित करणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही
पणजी : राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे लवकरच अधिसूचित करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पणजीतील आझाद मैदान, मडगावातील लोहिया मैदान, त्याशिवाय कुंकळ्ळी, असोळणा, पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके आदींचा त्यात समावेश असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रश्नोत्तर तासात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाची अनेक ठिकाणे म्हणजे दाऊडे, जुगारी आणि समाजकंटकांचे अड्डे बनले आहेत. यात खास करून पणजीतील आझाद मैदान आणि मडगावातील लोहिया मैदान यांचाही समावेश आहे. त्यामुळे या स्मारकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे आलेमाव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.
पुढे बोलताना त्यांनी, कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या देखभालीसाठी करदात्यांच्या पैशाचा वापर केला जाऊ नये, यासंबंधी भारतीय राज्यघटनेच्या कलम 27 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, असे निदर्शनास आणून दिले व कोणताही भेदभाव न करता देवस्थानांसह ऐतिहासिक महत्त्वाची सर्व ठिकाणे पुनर्स्थापित करण्यात यावी अशी विनंती केली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी दि. 15 जुलै 1583 मध्ये पोर्तुगीज राजवटीविऊद्ध गोव्याने केलेल्या पहिल्या उठावाच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य सरकारकडून 15 जुलै हा दिवस सरदार हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे सांगितले. तसेच राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे लवकरच अधिसूचित करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या विषयावर पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह अॅल्टन डिकॉस्टा, वेन्झी व्हिएगश, कार्लुस फेरेरा, विजय सरदेसाई, क्रूझ सिल्वा आदींनी विचार मांडले.