सर्बियात विद्यार्थी संघटनांचा ऐतिहसिक विजय
पुतीनसमर्थक वुचिच यांचा पराभव : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला यश
बेलग्रेडसह अनेक शहरांत तरुणांचा जल्लोष
सर्बियाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टुडंट लिस्ट’ आघाडीने संसदीय निवडणुकीत विजय मिळविला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी जवळचे संबंध असलेले अलेक्झांडर वुचिच यांच्या राजकीय गटाला पराभवाचा सामना करावा लागला. 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीचे अंतिम अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच वुचिच यांनी पराभव मान्य केला. विद्यार्थी आघाडीला 250 सदस्यीय संसदेत 135 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वुचिच यांच्या सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीला 105 जागा मिळू शकतात.
वृत्तसंस्था, बेलग्रेड
निवडणुकीतील विजयाची घोषणा होताच राजधानी बेलग्रेडसह विविध शहरांमध्ये नागरिकांनी जल्लोष केला. रस्त्यांवर हजारो लोक जमले, वाहनांचे हॉर्न वाजवून, घोषणा देऊन आणि आनंदोत्सव साजरा करून नागरिकांनी निकालाचे स्वागत केले. या जल्लोषात तरुणांची संख्या लक्षणीय होती. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी जवळपास 70 टक्के राहिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 1992 मध्ये युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यानंतरच्या सर्वाधिक मतदान झालेल्या निवडणुकांपैकी ही एक ठरली आहे.
16 जणांच्या मृत्यूनंतर आंदोलनाला सुरुवात
नोव्हेंबर 2024 मध्ये नोव्ही साद शहरातील रेल्वेस्थानकाच्या छतावरील संरचना कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आंदोलन सुरू केले. बांधकामातील कथित भ्रष्टाचार, प्रशासनातील अनियमितता आणि दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यातील विलंब यावर आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केले. पुढील काळात आंदोलनाचा विस्तार झाला. सरकारवर भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप करत विद्यार्थ्यांनी राजकीय आणि प्रशासकीय सुधारणांची मागणी केली. जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या या आंदोलनाचे रुपांतर अखेर निवडणुकीतील राजकीय आव्हानात झाले.
वुचिच यांची महत्त्वाकांक्षा
अलेक्झांडर वुचिच यांनी 2014-17 या काळात सर्बियाचे पंतप्रधान म्हणून काम केले. 2017 मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि 2022 मध्ये दुसऱ्यांदा या पदावर निवडून आले. तेथील राज्यघटनेनुसार दोन कार्यकाळांनंतर तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होता येत नसल्याने त्यांनी सप्टेंबर 2026 मध्ये पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संसदीय निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा पंतप्रधान होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र विद्यार्थी आघाडीच्या विजयामुळे त्यांच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.
भ्रष्टाचार निर्मूलनाचे आव्हान
निवडणुकीतील विजयामुळे विद्यार्थी आघाडीसमोर आता सरकार स्थापन करण्याची आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी असेल. भ्रष्टाचार विरोधात कारवाई, सरकारी संस्थांमध्ये पारदर्शकता, कायद्याचे राज्य आणि लोकशाही संस्थांचे बळकटीकरण हे प्रमुख मुद्दे असतील. मात्र, अंतिम निकाल आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेल्या नेतृत्वाला प्रत्यक्ष प्रशासन चालवताना अनेक राजकीय आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
कोसोव्होबाबत काय भूमिका?
वुचिच यांच्या पराभवानंतर सर्बियाच्या परराष्ट्रय धोरणात किती बदल होईल, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आहे. सर्बियाचे रशियाशी पारंपरिक संबंध आहेत, तर युरोपीय महासंघात प्रवेशाची प्रक्रियाही सुरू आहे. कोसोव्होच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही सर्बियाच्या राजकारणात महत्त्वाचा आहे. विद्यार्थी आघाडीने देशांतर्गत सुधारणांवर भर दिला असला, तरीही रशिया, युरोपीय महासंघ आणि कोसोव्हो यांच्याबाबतचे धोरण कसे असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सर्बियातील सत्तांतराचे प्रत्यक्ष परिणाम नव्या सरकारच्या निर्णयांवर अवलंबून असतील.