लंकेचा किवीजवर ऐतिहासिक मालिका विजय
15 वर्षांनंतर मिळविले यश, 2-0 फरकाने न्यूझीलंडवर मात, प्रभात जयसूर्या ‘मालिकावीर’, कमिंदू मेंडीस ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ गॅले
लंकन क्रिकेट संघाने तब्बल 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच बलाढ्या न्यूझीलंडवर ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळविण्याचा पराक्रम केला. रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवशी लंकेने न्यूझीलंडचा एक डाव आणि 154 धावांनी दणदणीत पराभव केला. लंकेने या मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा ‘व्हाईटवॉश’ केला. लंकेच्या प्रभात जयसूर्याला ‘मालिकावीर’ तर कमिंदू मेंडीसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या दुसऱ्या कसोटी सामन्यात लंकेने पहिला डाव 5 बाद 602 धावांवर घोषित केला. कमिंदू मेंडीसने नाबाद 182 धावांची तर चंडीमलने 116 धावांची आणि कुशल मेंडीसने नाबाद 106 धावांची खेळी केली. लंकेतर्फे तीन फलंदाजांनी शतके झळकवली. मॅथ्यूजने 88 तर करुणारत्नेने 46 आणि डिसिल्व्हाने 44 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे फिलिप्सने 3 तर साऊदीने 1 गडी बाद केला.
लंकेच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव 39.5 षटकात केवळ 88 धावांत उखडला गेला. प्रभात जयसूर्या न्यूझीलंडचा कर्दनकाळ ठरला. त्याने 42 धावांत 6 तर निशान परेराने 33 धावांत 3 आणि असिता फर्नांडोने 1 गडी बाद केला. लंकेने 514 धावांची आघाडी घेतल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला फॉलोऑन दिला.
फॉलोऑन स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत मोठा पराभव लांबविण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडने 5 बाद 199 या धावसंख्येवरुन रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित पाच गडी 161 धावांची भर घालत तंबूत परतले. न्यूझीलंडचा दुसरा डाव 51.4 षटकात 360 धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात सलामीच्या कॉनवेने 62 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 61, विलियमसनने 58 चेंडूत 4 चौकारांसह 46, ब्लंडेलने 64 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 60, फिलिप्सने 99 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 78, सँटनरने 115 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 67, कर्णधार साऊदीने 1 षटकार, 1 चौकारासह 10, एजाझ पटेलने 40 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. लंकेतर्फे निशान पेरीसने 170 धावांत 6 तर प्रभात जयसूर्याने 139 धावांत 3 तसेच डिसिल्व्हाने 28 धावांत 1 गडी बाद केला.
कॉनवे आणि विलियमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 97 धावांची भागिदारी केली. त्यानंतर न्यूझीलंडचे 3 फलंदाज लवकर बाद झाले. न्यूझीलंडची एकवेळ स्थिती 5 बाद 121 अशी केविलवाणी होती. ब्लंडेल आणि फिलिप्स यांनी सहाव्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी केली. ब्लंडेल बाद झाल्यानंतर फिलिप्सने सँटनरसमवेत सातव्या गड्यासाठी 64 धावांची भर घातली. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच न्यूझीलंडचा दुसरा डाव 360 धावांवर आटोपल्याने लंकेने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. या मालिकेतील 2 सामन्यात 18 बळी घेणाऱ्या प्रभात जयसूर्याला मालिकावीर तर केवळ 8 कसोटीतील 13 डावांत 1000 धावांचा टप्पा गाठणाऱ्या कमिंदू मेंडीसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात त्याने नाबाद 182 धावा जमविल्या. या संपूर्ण मालिकेत न्यूझीलंडचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करण्यासाठी शेवटपर्यंत झगडत राहिला. लंकेने अलिकडच्या कालावधीत सलग 3 कसोटी सामने जिंकले असून पुढील वर्षीच्या जून महिन्यात लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी लंकन संघाने आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक - लंका प. डाव 163.4 षटकात 5 बाद 602 डाव घोषित, न्यूझीलंड प. डाव 39.5 षटकात सर्व बाद 88, न्यूझीलंड दु. डाव 51.4 षटकात सर्व बाद 360 (कॉन्वे 61, विलियमसन 46, ब्लंडेल 60, फिलिप्स 78, सँटेनर 67, पटेल 22, रचिन रवींद्र 12, अवांतर 3, निशांत पेरीस 6-170, प्रभात जयसूर्या 3-139, डिसिल्व्हा 1-28).