बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय
दुसऱ्या कसोटीत 6 गड्यांनी पाकवर मात, लिटन दास सामनावीर, मेहदी हसन मिराज मालिकावीर
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
बांगलादेशने मागील दोन आठवड्यांत दाखविलेले वर्चस्व पूर्ण करताना पाकिस्तानविऊद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळविला आहे. दुसऱ्या कसोटीची सुरुवात पावसाने प्रभावित होऊनही ही कामगिरी त्यांनी करून दाखविलेली आहे. पहिल्या सामन्यात 10 गडी राखून नमवताना बांगलादेशने पाकिस्तानवरील पहिला कसोटी विजय नोंदविला होता. दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळविल्याने मालिका खात्यात जमा करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली आहे. बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीर तर मालिकेत 155 धावा व 10 बळी मिळविणाऱ्या मेहदी हसन मिराजला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.
आयसीसीनुसार, झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज वगळता इतर संघाविरुद्धचा दोन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या मालिकेतील बांगलादेशचा हा पहिला मालिका विजय आहे. या विजयामुळे बांगलादेशला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत बळ मिळाले आहे आणि इंग्लंडला मागे टाकत 45.83 गुणांच्या टक्केवारीसह ते चौथ्या क्रमांकावर पोहोचगले आहेत. पाचव्या दिवसाची सुऊवात बिनबाद 42 वरून करताना बांगलादेशला विजयासाठी आणखी 143 धावांची गरज होती. बांगलादेशने खूप जोखीम न घेता माफक लक्ष्यापर्यंत मजल मारताना स्थिर सुऊवात केली.
बंगलादेशने सकाळच्या सत्रात आणखी 80 धावांची भर घातली. पण 12 धावांच्या आत दोन्ही सलामीवीर गमावले. तरीही नजमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हक या अनुभवी जोडीने 57 धावांची भागीदारी करत पाहुण्यांचे आणखी पडझड घडविण्याचे इरादे फळू दिले नाहीत. उपाहारानंतर शांतो आणि मोमिनुल बाद झाले. त्यामुळे बांगलादेश शेवटच्या टप्प्यात थोडेसे गडबडले. तथापि, मुशफिकुर रहीम व शकीब अल हसन या अनुभवी जोडीने टिकाव धरला आणि बांगलादेशला आणखी अडचणींचा सामना न करू देता विजयाचा मार्ग दाखविला.
या कसोटीत प्रथम क्षेत्ररक्षण पसंत केल्यानंतर बांगलादेशने पाक कर्णधार शान मसूद व सलामीवीर सैम अयुब यांनी अर्धशतके झळकावूनही मेहदी हसन मिराझचे पाच बळी आणि तस्किन अहमदचे तीन बळी यांच्या जोरावर पाकिस्तानला माफक 274 धावांत गुंडाळले होते. पाकिस्ताननेही चोख प्रत्युत्तर देताना खुर्रम शहजादने सहा बळी घेत यजमानांना 12 धावांची आघाडी मिळवून दिली होती. मात्र, बांगलादेशच्या 24 वर्षीय हसन महमूद आणि 21 वर्षीय नाहिद राणा यांनी मिळून नऊ बळी घेतल्याने पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 172 धावांत गडगडला होता आणि खेळाची चार सत्रे बाकी असताना 185 धावा जमविण्याचे लक्ष्य बांगलादेशसमोर राहिले होते. खराब हवामान व खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबला होता. पण त्यामुळे पाकिस्तानचा पराभव टळू शकला नाही.
पाकला मायभूमीत झालेल्या गेल्या दहा कसोटीत एकही विजय मिळविता आलेला नाही. दहापैकी सहा कसोटीत त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली तर चार सामने अनिर्णीत राहिले. अशी नामुष्की याआधी बांगलादेशवरही आली होती.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान पहिला डाव सर्व बाद 274, बांगलादेश पहिला डाव सर्व बाद 262, पाकिस्तान दुसरा डाव सर्व बाद 172, बांगलादेश दुसरा डाव 4 बाद 185 (झाकीर हसन 40, नजमुल हुसेन शांतो 38, मोमिनुल हक 34, मुशफिकुर रहीम नाबाद 22, शकीब अल हसन नाबाद 21 धावा, मीर हमजा, खुर्रम शहजाद, अब्रार अहमद व सलमान अली आगा प्रत्येकी 1 बळी)