For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहारा वाळवंटावरील ऐतिहासिक सरोवर

07:00 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सहारा वाळवंटावरील ऐतिहासिक सरोवर
Advertisement

जगातील सर्वात मोठ्या आणि तप्त वाळवंटापैकी एक सहारा वाळवंट स्वत:मध्ये अनेक रहस्यं सामावून आहे. लीबियाच्या दक्षिण-पश्चिमेतील फेजान क्षेत्रात स्थित ‘उबारी सँड सी’ एक असाच भाग आहे, जेथे वाळूच्या टेकड्यांदरम्यान निळ्या आणि कधीकधी लाल रंगांची सरोवरं दिसून येतात. ही सरोवरं जणू रक्ताने भरलेली असल्याचे वाटू लागते. हे दृश्य काल्पनिक चित्रपटाप्रमाणे भासते, परंतु याची वास्तविकता कोट्यावधी वर्षे जुना इतिहास आणि हवामान बदलाच्या वेदनादायी कहाणीशी निगडित आहे.  सुमारे 2 लाख वर्षांपूर्वी या भागात मुसळधार पाऊस पडायचा आणि नद्या वाहत होत्या. या नद्यांनी मिळून ‘मेगाफेजान’ नावाच्या विशाल सरोवराची निर्मिती केली होती, ज्याचा आकार चेक प्रजासत्ताक या देशासमान म्हणजेच जवळपास 1 लाख 20 हजार चौरस किलोमीटर होता. कालौघात हवामान बदलले आणि सुमारे 3 ते 5 हजार वर्षांपूर्वी विशाल जलभांडाराचे बाष्पीभवन होत ते अस्तित्वहीन झाले. आता याच विशाल सरोवराच्या अवशेषांच्या रुपात येथे 20 छोटी सरोवरं शिल्लक असून ती उंच टेकड्यांदरम्यान पाण्याच्या डागांप्रमाणे चमकतात.

Advertisement

या सरोवरांमध्ये सर्वात प्रसिद्ध ‘उम्म अल-मा’ आणि ‘गॅबरून’ आहे. गॅबरून सरोवर पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असून तेथे जुन्या गावांमधील पडक्या इमारतींनजीक थांबण्याच आणि सामग्री खरेदीची व्यवस्थाही आहे. येथे ‘उम्म अल-हिसान’ सारखी आणखी सुंदर सरोवरं देखील आहेत, परंतु तेथवर पोहोचणे प्रत्येकासाठी सोपे नाही. या सरोवरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे त्यांचा अत्याधिक खारटपणा आहे. येथे कुठलीच नदी नसल्याने आणि उन्हाचा तडाखा मोठा असल्याने यात खनिजांचे प्रमाण समुद्राच्या पाण्यापेक्षा 5 पट अधिक झाले आहे. काही सरोवरांमध्ये तर विशेष शेवाळांमुळे पाण्याचा रंग रक्तासारखा लाल दिसतो. ही सरोवरं 7-32 मीटरपर्यंत खोल आहेत, परंतु ती आटण्याचा धोका घोंगावत आहे. सहाराखाली पाण्याचे नैसर्गिकस्रोत मर्यादित आहेत आणि वाढती लोकसंख्या त्यांचा वेगाने वापर करत आहे. लीबिया सरकारच्या ‘ग्रेट मॅन-मेड रिव्हर’ प्रकल्पाने या धोक्याला आणखी वाढविले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतर्गत पाइपलाइनद्वारे वाळवंटाला हिरवेगार करण्यासाठी भूजलाचा वापर होतोय. जर हे सत्र सुरू राहिले तर पुढील 50-100 वर्षांमध्ये ही ऐतिहासिक आणि सुंदर सरोवरं कायमस्वरुपी इतिहासाच्या पानापुरती मर्यादित राहतील असे जाणकारांचे सांगणे आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.