कडोली येथील ऐतिहासिक दसरोत्सव उत्साहात
वार्ताहर/कडोली
हर हर महादेव, श्री कलमेश्वर देवालयाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात गुलाल, भंडाऱ्याच्या उधळणीत आणि विविध वाद्यांच्या गजरात कडोली येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवालयाचा ऐतिहासिक दसरोत्सव अपार उत्साहात पार पडला. कडोली ग्राम पंचायत, देवस्थान पंचकमिटी, हक्कदार आणि काकती पोलिसांच्या सहकार्याने यात्रा सुरळीत पार पडण्यास मदत झाली. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने जमलेली तरुणाई थिरकताना पहावयास मिळाली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मात्र पोलिसांना परिश्रम करावे लागले. सर्वत्र सीसीटीव्ही लावून बारकाईने नजर ठेवण्यात आली होती.
पहाटे 5 वाजल्यापासून श्री कलमेश्वर देवालयाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात तरुणाईची संख्या कमी होती. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना कोणताही त्रास झाला नाही. धनगरी ढोल, सनई, ताशांच्या गजरात आणि गुलाल, भंडाऱ्यांच्या उधळणीत शेतकरी बैलजोडी मालकांनी बैलांची मिरवणूक काढली. यावेळी सर्व बैलांना आकर्षक सजविण्यात आले होते. तर इस्कॉन संस्थेच्यावतीने भजनाच्या तालात श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान मूर्तीची मिरवणूक काढली. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत हजारो भाविकांनी देवालयाचे दर्शन घेतले. सायंकाळी गाऱ्हाणे घातल्यानंतर देवस्थानच्या पालख्या सोने लुटण्यासाठी गावच्या वेशीकडे पळवत नेण्यात आल्या.सोमवारी श्रीक्षेत्र प्रभुदेव डोंगरावर गेल्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन दसरोत्सवाची सांगता होणार आहे.