भारतीय महिला टेनिसपटूंची ऐतिहासिक कामगिरी
वृत्तसंस्था/ पुणे
येथील बालेवाडीच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या बिली जिन किंग चषक महिलांच्या सांघिक आशिया ओसेनिया गट 1 लढतीतमध्ये यजमान भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
या स्पर्धेच्या इतिहासात भारताने 2020 साली प्ले ऑफ गटात प्रथमच प्रवेश मिळविला होता. पुण्यातील या स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाने आघाडीचे स्थान मिळविले. त्यांनी आपल्या शेवटच्या सामन्यात हाँगकाँग चीनचा 2-1 असा पराभव केला. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील झालेल्या लढतीमध्ये हैदराबादच्या श्रीवल्ली भामिदीपतीने पहिल्या एकेरी सामन्यात दक्षिण कोरियाच्या सोयून पार्कचा 5-7, 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला. या विजयामुळे भारताने दक्षिण कोरियावर 1-0 अशी आघाडी मिळविली. हा सामना 2 तास 52 मिनिटे चालला होता. दुसऱ्या एकेरी सामन्यात दक्षिण कोरियाच्या देयॉन बॅकने भारताच्या सहेजा यमलापल्लीवर 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये मात केल्याने दक्षिण कोरियाने भारताशी 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या दुहेरीच्या सामन्यात भारताच्या अंकिता रैना आणि प्रार्थना ठोंबरे यांनी दक्षिण कोरियाच्या पार्क आणि किम यांचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत आपल्या संघाला 2-1 अशा फरकाने विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताने प्ले ऑफ गटात प्रवेश केला आहे. या स्पर्धेमध्ये भारताने आपले प्राथमिक फेरीतील सर्व सामने जिंकले. हा दुहेरीचा सामना 70 मिनिटे चालला होता. आता प्ले ऑफ फेरीत 2025 च्या विभागीय गट 1 मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघामध्ये आता भारताचा समावेश राहिल. प्ले ऑफ फेरीमध्ये 3 गट पाडण्यात येणार असून प्रत्येक गटात 3 संघांचा समावेश राहिल. या प्ले ऑफ स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेता संघ 2026 च्या बिली जिन किंग चषक सांघिक स्पर्धेसाठी पात्र ठरेल.