For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ये ‘भागवत’ का सार है..!

06:45 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
ये ‘भागवत’ का सार है
Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत भरकटलेल्या काही अनुयायांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले. भारत विश्वगुरू विषयावर व्याख्यानात त्यांनी भारतात तीन हजार वर्षांपासून तमाम धर्म आणि विचारांना मानणारे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ही ओळख यापुढेही दृढ ठेवावी लागेल. आपसात वाद वाढवण्याऐवजी एकात्मतेचे आदर्श उदाहरण जगासमोर ठेवावे लागेल. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे करोडो हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक होते. तेथे मंदिर उभारण्यास विशेष परिस्थिती होती, ते ठीक आहे. पण, आता काही लोक हिंदूंचा नेता बनण्यासाठी ठीकठिकाणी मंदिर, मशीद मुद्दा उकरून काढत आहेत हे देशाच्या सौहार्दाच्या वातावरणाला नुकसानकारक आहे. मंदिराच्या कळसावर कावळा बसला तर तो गरुड होतो का? गाडलेली मढी उकरण्याला राजकीय यशस्वीतेचा फॉर्म्युला समजणे देशहिताचे नाही. मुसलमान कट्टरपंथी होते म्हणून आपणही कट्टरपंथी व्हावे असा विचार योग्य नाही. इस्लाम या देशात बाहेरून आलेला आहे. येथे प्रदीर्घकाळ विदेशी शासन होते त्यामुळे आजही काही मुसलमान स्वत:ला बादशहा समजतात. ही धारणा चुकीची आहे. आता देश संविधानावर चालतो, इथली जनता आपला प्रतिनिधी स्वत: निवडून देते. ते ज्याला निवडून देतील तेच यापुढे राज्य करतील. अल्पसंख्यांकांच्या तुष्टिकरणाचे राजकारण जितके चुकीचे तेवढेच बहुसंख्यांना चेतवून धार्मिक भावनेचा राजकीय लाभ घेणेही चुकीचे आहे. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे भागवत यांनी मांडले. रविवारी अमरावतीत महानुभाव आश्रमाच्या कार्यक्रमात देखील भागवतांनी, धर्म समजावून सांगावा लागतो. तो जर नीट समजला नाही तर धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगात धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत ते याच चुकीच्या समजूतीमुळे झाले आहेत. समाजाला विवेक समजावणारे पंथ आणि संप्रदाय हवे आहेत अशी भावना व्यक्त केली. काही काळापासून भागवत सातत्याने एक व्यापक भूमिका मांडत आहेत. त्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. त्यांचे हे वक्तव्य केवळ मंदिर आणि मशिदीचे वाद उकरले जाण्यामुळे आले नाही. मात्र आजपर्यंत जो भाजपच्या अधिपत्याखाली वावरणारा वर्ग संघाचे सर्व काही ऐकत होता तो विशेषत: उत्तर भारतात सध्या ज्या पद्धतीने अनियंत्रित होऊ लागला आहे, त्यातून आला आहे. त्यांना भागवतांच्या या विचारांपेक्षा पियुष मिश्राच्या गीतातील ‘कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है, के युद्ध ही तो वीर का प्रमाण है, कौरवोकी भीड हो या पांडवोकी नीड हो, जो लढ सका वही तो एक महान है’ या ओळींची भुरळ अधिक पडून ‘मस्तकांचे झुंड’ बेबंद धावताना दिसत आहेत. अर्थ न समजता हे गीत आजच्या काळातील कथीत धर्मयुद्धाचे प्रेरणा गीत बनण्याच्या स्थितीत आहे. असंख्य लोक कोणताही विचार न करता आपण जणू धर्मयुद्धाला उतरलो आहोत अशा आवेशात वागू, जगू आणि बोलू लागले आहेत. युगांच्या प्रतीक्षेनंतरच्या सत्तेचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे असा आग्रह ही मंडळी धरू लागली आहेत. हा आग्रह कृतीत उतरून हिंसक घटनाही घडवू लागला आहे. दुसरीकडे ठीकठिकाणी मंदिर आणि मशिदीच्या वादाचे दावे दाखल करण्याचा सपाटा लावला जात आहे. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाला अशा प्रकरणाचे दावे जिल्हा न्यायालयांनी दाखल करून घेऊ नयेत असे आदेश द्यावे लागले आहेत. सामान्य जीवन जगण्याऐवजी शत्रूभाव वाढवण्यात खूप मोठा वर्ग गुंतलेला दिसत आहे. ठिकठिकाणी निघणारे मोर्चे, दंगली, गोवंश हत्येच्या शंकेने केलेले हल्ले आणि त्यात भडकलेल्या कार्यकर्त्यांनी काही स्वधर्मिय युवकांचाही घेतलेला बळी या घटना नजरेसमोर असल्यानेच सरसंघचालक भागवत यांनी वरील वक्तव्य केले असावे. कोणत्याही राज्यकर्त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला लागू नये. पण येथे तर राज्यकर्ते आणि समाज दोन्हीला जाणीव करून द्यायची वेळ आली असल्याने भागवत यांनी केलेले वक्तव्य खूपच महत्त्वाचे आहे. ती सध्या देशाची गरज बनली आहे. देशाच्या विविध प्रांतात घडत असणाऱ्या हिंसक घटना, मणिपूर सारख्या छोट्या राज्यातसुद्धा आटोक्यात न येणारी वांशिक विध्वंसकारी दंगल ही कोणत्याही राज्यकर्त्याच्या काळाची ओळख बनता कामा नये. सत्तांतर झाले असेल तर त्याचे प्रत्यंतर हे शांतीपर्वातून दिसून येणे गरजेचे असते. प्रत्येक विचाराच्या सत्तेला आपल्या पद्धतीने राज्य करण्याचा अधिकार जरूर असतो. मात्र ज्या देशाची उभारणी घटनेच्या आधारावर झाली आहे, त्या भारतासारख्या देशात घटनेप्रमाणेच राज्य चालले पाहिजे. येथे तुष्टीकरण नको ही मागणी योग्य. पण, त्याचवेळी बहुसंख्यांकांचे वर्चस्वही नसावे. हजारो वर्षांची परंपरा सांगणाऱ्या आणि त्याची दखल कायदे बनवतानाही घेणाऱ्या घटनेनुसार इथली राज्यपद्धती असली पाहिजे हा आग्रह भागवत यांनी धरला असेल तर तो खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणावा लागेल. भागवत यांना राज्यकर्ते आणि अनुयायांना हे वारंवार का सांगावे लागत आहे? असे तिरकस प्रश्न करणाऱ्यांनीही स्वत:त सुधारणा करून सहिष्णुतेचे दर्शन घडवले पाहिजे. त्यांच्या वक्तव्यातून वेगळे अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. दोन विचार पद्धतींमध्ये किमान तेवढी तरी मतभिन्नता नक्कीच असणार. विरोधकांनी सुद्धा या भूमिकेचे स्वागत करावे आणि भागवतांनी घेतलेली भूमिका राज्यकर्त्यांची आणि त्यांच्या अनुयायांचीही बनली पाहिजे यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. तरच काळाच्या प्रवाहात आज निर्माण झालेला दुभंग कुठेतरी मुजून भारताची वाटचाल निकोप लोकशाहीच्या दिशेने सुरू राहील.

Advertisement

Advertisement
Tags :

.