हिरोमोटो खरेदी करणार अॅथर एनर्जीमधील हिस्सा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरोमोटो कॉर्पने अॅथर एनर्जीमधील 3 टक्के अतिरिक्त हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. ही माहिती हीरो मोटोकॉर्पने आपल्या मार्केट रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये दिली आहे. साधारणपणे हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी जवळपास 140 कोटी रुपयांचा करार होणार असल्याची अपेक्षा आहे. या व्यवहारानंतर कंपनीचा हिस्सा हा जवळपास 39.8 टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती आहे.
अतिरिक्त शेअर्स खरेदी केल्यानंतर, अॅथर एनर्जीमधील कंपनीचा हिस्सा 39.7 टक्के वाढेल. हिरोमोटोने सांगितले की, कंपनी हा अतिरिक्त हिस्सा अॅथर एनर्जीच्या विद्यमान भागधारकांकडून विकत घेईल. हा करार 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
ऑक्टोबर 2013 मध्ये अॅथर एनर्जीचा समावेश केला गेला. ही कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या डिझाईनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, विक्री आणि सर्व्हिसिंगच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीचे स्वत:चे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरदेखील आहे. अॅथर एनर्जीची उलाढाल 2022-23 या आर्थिक वर्षात 1806.1 कोटी रुपये, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 413.8 कोटी रुपये आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 79.8 कोटी रुपये होती.
हिरो मोटोकॉर्पने दुसऱ्या फाइलिंगमध्ये आपल्या व्यवस्थापनातील बदलांची माहिती दिली. कंपनीने सांगितले की, विवेक आनंद यांची हिरोमोटो कॉर्पचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.