For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामगारांना कामावर घ्या, नंतर काम करा

02:41 PM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
कामगारांना कामावर घ्या  नंतर काम करा
Advertisement

सुर्ल सांखळी येथील सेसा कंपनीच्या गेटवर कुटुंबियांसह कामगारांचा ठिय्या, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लक्ष घालावे

Advertisement

साखळी : डिंगणे सुर्ल सांखळी येथील सेसा रिसोर्सीस लि. या खाण कंपनीतील 84 कामगारांना गेल्या 26 जुलै रोजी अचानकपणे कामावरून कमी केल्यामुळे प्रकरण न्याप्रविष्ट बनले आहे. असे असताना डिंगणे खाणीवरील खनिज माल इतरत्र हलविण्यात येत असल्याची माहिती मिळताच तो अडविण्यासाठी या कामगारांनी आपल्या कुटुंबियांसह कंपनीच्या गेटवर रखरखत्या उन्हात ठाण मांडले आहे. कामगारांना कामावर घ्या आणि नंतर काम सुरू करा, अशी मागणी या कामगारांनी लावून धरली आहे. डिंगणे-सुर्ला येथील सेसा रिसोर्सीस लि. या खाण कंपनीने अन्याय करत या कामगारांना कामावरून कमी केले. त्यानंतर या कामगारांनी अनेकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी  दखल घेऊन कंपनी व्यवस्थापनाला या कामगारांना कामावर घेण्याची सूचना केली होती. परंतु याकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे सदर खाण लिलावात जेएसडब्लू कंपनीने घेतली असल्याने लवकरच त्यांचे काम सुरू होणार व सर्व कामगारांना या कंपनीत कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. जेएसडब्लू कंपनीचे काम सुरू होण्यास वेळ जाणार, परंतु सध्या या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. कंपनीचे आमोणा, सुर्ल, डिचोली येथे काम सुरू आहे. तेथे या कामगारांना कामावर घेता येते. परंतु कंपनी हेतुपुरस्सरपणे या कामगारांवर अन्याय करत आहे. या कंपनीतील माल सुर्ल प्रकल्पावर आणल्यानंतर तेव्हा आठ महिन्यांचे काम या कामगारांना मिळणार असे सांगण्यात आले होते. परंतु हा माल आता आमोणा येथे नेत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या कामगारांना आमोणा येथे कंपनीने कामावर घ्यावे, अशी मागणी कामगार समीर आमोणकर यांनी केली. सेसा कंपनी आपल्याकडे काहीच नसल्याचे सांगतात पण दुसऱ्या बाजूने आपले काम सुरू ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी विनंती करूनही ते ऐकत नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना आमची परिस्थिती माहीत आहे.

Advertisement

त्यांनी या विषयी गांभीर्याने लक्ष घालून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी दशरथ भामईकर यांनी यावेळी केली. या कंपनीचा माल चौगुले खाण कंपनीने घेतला आहे. हा माल सेसाच्या प्रकल्पातच जाणार असल्याने त्या प्लांटवर आम्हाला काम मिळणार अशी आम्हाला आशा होती. या एसआर लि. प्रकल्पावर कंपनी आमोणा, कोडली येथील कामगार आणत होती. तरीही त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे या कामासाठी डिंगणे सुर्लतील कामगारांना नेणार असे दिसत होते. मात्र आता हा माल भलत्यालाच दिला असून तो माल आमोणा येथे नेला जात आहे. आमोणा येथे हा माल नेल्यास आम्हाला काम मिळणार नाही. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे व आम्हाला आमोणा येथे कामावर घेण्यासाठी कंपनीला सक्ती करावी व आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी विनय वळवईकर यांनी यावेळी केली.

कटुंबांसमोर घर खर्च चालविण्याचा प्रश्न!

सेसा रिसोर्सीस लि. या कंपनीने या 84 कामगारांना कामावरून काढल्याने प्रत्येक घराची परिस्थिती बिकट झाली आहे. घर कसे चालवावे ही समस्या प्रत्येक कामगाराच्या पत्नीसमोर आहे. त्यातच त्यांची कर्जे, घर संसार व मुलांचा खर्च आहे. हे सर्व सांभाळताना महिलांना नाकीनऊ येत आहे. आता त्यांचे नोकरीचे वयही उलटले आहे. या वयावर त्यांना कोणी कामाला ठेवू शकत नाही. तेव्हा या कंपनीने तसेच मुख्यमंत्र्यांनी या कामगारांचा विचार करून त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कंपनीला सक्ती करावी, अशी मागणी एक गृहिणी प्रतिमा नार्वेकर यांनी केली.

Advertisement
Tags :

.