डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची नेमणूक करा
खानापूर येथील शिशू-माता दवाखान्यात डॉक्टरांची नेमणूक नसल्याने रुग्णांचे हाल
खानापूर : माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून शहरात शिशू-माता दवाखाना उभारण्यात आला आहे. या दवाखान्याचे दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी आरोग्य मंत्र्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले आहे. या दवाखान्यासाठी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली नसल्याने तसेच संपूर्ण क्षमतेने या दवाखान्यात सेवा देण्यात येत नसल्याने प्रसूती महिला आणि बाळांची दवाखान्यात ससेहोलपट होत आहे. यासाठी दवाखान्यात आवश्यक असलेल्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणूक करून हा दवाखाना पूर्ण क्षमतेने सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
खानापूर परिसरात प्रसूतीसाठी मोठ्या दवाखान्याची आवश्यकता होती. यासाठी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करून खानापूर शहरात नव्याने 35 खाटांचा शिशू-माता दवाखाना मंजूर करून घेतला आहे. त्यांच्याच कार्यकाळात दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या कार्यकाळात सप्टेंबर 2024 मध्ये करण्यात आले आहे. उद्घाटन घाईगडबडीत करण्यात आले. त्यानंतर बरेच महिने या हॉस्पिटलमध्ये काहीही सुविधा देण्यात येत नव्हता. गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गांभीर्याने घ्यावे
शहरासाठी अद्ययावत दवाखान्याची निर्मिती होऊनदेखील प्रसूतीसाठी बेळगावला पाठवण्यात येत आहे. त्यामुळे हा दवाखाना शोभेची वस्तू झालेली आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन सध्या सुरू असलेल्या अधिवेशन काळात आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन शिशू-माता दवाखान्यासाठी आवश्यक डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाच्या नेमणुकीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलाना नाहक त्रास
खानापूर येथे नव्याने शंभर खाटांचा दवाखाना मंजूर झाला असल्याने जुन्या दवाखान्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था शिशू-माता दवाखान्यात हलविण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी शिशू-माता दवाखान्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टरांची अद्याप नेमणूक करण्यात आली नसल्याने या ठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.