हिंदुस्थान युनिलिव्हरला 2694 कोटीचा नफा
दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर : महसूल 2 टक्के वधारला
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने या अवधीत 2694 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. यासंबंधीची घोषणा कंपनीने गुरुवारी केली आहे. कंपनीने नफ्यात 3.8 टक्के इतकी नाममात्र वाढ नोंदवली आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 2595 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने महसुलात 2.1 टक्के वाढ नोंदवली असून या अवधीत कंपनीने 16034 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत पाहता कंपनीने 15703 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. याचदरम्यान नफ्याची घोषणा करतानाच कंपनीने 19 रुपये प्रति समभाग अंतरीम लाभांशही जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख 9 नोव्हेंबर असणार आहे.
काय म्हणाल्या सीईओ
कंपनीच्या सीईओ प्रिया नायर म्हणाल्या की, एकंदर देशांतर्गत बाजारात उत्साह तिसऱ्या तिमाहीत परतू शकतो. अलीकडेच सरकारने जीएसटी दरात नव्याने कपातीसह सुधारणा केल्यानंतर ग्राहकांकडून आमच्या वस्तुंची मागणी वाढलेली आहे. ग्राहकांकडून खरेदीवर भर दिला जात असून पुढील तिमाहीत कंपनीची आर्थिक स्थिती अधिक बळकट होताना दिसेल, अशी आशा असल्याचे त्या म्हणाल्या.