For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामाच्या नावावर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाही!

06:13 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
रामाच्या नावावर लुटणाऱ्यांना  हिंदू माफ करणार नाही
Advertisement

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल : राज्यव्यापी आंदोलनाची दिली हाक

Advertisement

त.भा. प्रतिनिधी, मुंबई, :

अयोध्येतील राममंदिरातील देणगी आणि निधीच्या कथित अपहाराच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रविवारी मुंबईतील दादर येथील प्राचीन हनुमान मंदिरात ‘रामरक्षा‘ आंदोलन छेडले. भरपावसात झालेल्या या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करत, ‘राममंदिर लुटणाऱ्यांना आता हिंदू माफ करणार नाही, या प्रकरणाचा निपक्षपाती तपास होऊन दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा दिला. राज्यभर ‘रामरक्षा पठण’ सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.

Advertisement

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या लुटीच्या निषेधार्थ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज मुंबईत ‘रामरक्षा’ आंदोलन केले. दादर येथील ऐतिहासिक मारुती मंदिराजवळ झालेल्या या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. विशेष म्हणजे, मुसळधार पावसाची तमा न बाळगता या आंदोलनासाठी रामभक्त आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती.

आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. राममंदिर उभारणीसाठी झालेले आंदोलन, कारसेवा, त्यावेळी झालेला संघर्ष आणि त्यानंतर मुंबईने झेललेल्या दंगली व बॉम्बस्फोटांची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, त्या कठीण काळात हिंदूंच्या पाठीशी केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. त्यांनी हिंदूंच्या हातात भगवा दिला. आज ज्यासाठी संघर्ष केला तीच मंडळी सत्तेत गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज दादरमध्ये पेटलेली ही ठिणगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. राममंदिरातील कथित गैरव्यवहाराचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा देतानाच राज्यभरात रामरक्षा पठण सुरू करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

हिंदुत्व पुन्हा जागे करायचेय

अयोध्येतून समोर येत असलेल्या कथित गैरव्यवहारांच्या बातम्यांवर संताप व्यक्त करत ते म्हणाले, शिवसेनेने राममंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे गेली? कष्टकरी हिंदूंनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांची लूट करणाऱ्यांना हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा संदेश पुन्हा जागा करण्याची वेळ आली आहे, असेही ठाकरे म्हणाले.

‘मशाल आमच्या हातात आहे; लंका जाळल्याशिवाय राहणार नाही’

भाजपवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमचा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला; पण हनुमानाने लंका जाळली ती मशाल आजही आमच्या हातात आहे. जशी वानरसेनेने रावणाची लंका जाळली, तशी तुमची लंका जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी ठणकावले. तुमच्या धमन्यांत खऱ्या हिंदूंचे रक्त असेल, तर रामरक्षा पठणासाठी आमच्यासोबत रस्त्यावर या. आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. राम सर्वांचा आहे, कोणत्याही पक्षाचा नाही. चोरांनी प्रभू श्रीरामाचे नाव घेऊ नये. हिंदूंनी चोरांचे संरक्षण करण्यासाठी नव्हे, तर प्रभू श्रीरामाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

मला आनंद आहे शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले : मुख्यमंत्री फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मला आनंद आहे शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले. आमची अपेक्षा एव्हढीच होती की, उद्धव ठाकरेंना श्रीराम आठवले पाहिजेत. उद्धव ठाकरेंनी रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर उद्धव ठाकरेंचं भल होईल. केवळ एकदा नाहीतर रोज रामरक्षा म्हणावी, ही माझी अपेक्षा आहे.’

Advertisement
Tags :

.