अफगाणिस्तानात हिंदू अन् शिखांना परत मिळणार संपत्ती
अफगाणिस्तानातील राजवटीला सुचला शहाणपणा
वृत्तसंस्था/ काबूल
भारतासोबत जुळवून घेण्याच्या आणखी एका प्रयत्नात आता अफगाणिस्तानात तालिबानची राजवट हिंदू आणि शिखांना त्यांच्या मालकीची राहिलेली जमीन परत करण्याचा पुढाकार हाती घेणार आहेत. या संपत्तींना अफगाणिस्तानातील टोळीप्रमुखांनी बळकाविले होते, आता त्यांच्या कब्जातून या संपत्ती मुक्त केल्या जात आहेत. अफगाणिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांवरील अन्याय दूर करण्यासाठी हा पुढाकार हाती घेण्यात आला आहे. या अल्पसंख्याकांना दीर्घकाळापर्यंत विस्थापनाला सामोरे जावे लागले असल्याचे तालिबानच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.
भारतीय अधिकारी या घडामोडीला भारताबद्दल सकारात्मक संकेत मानत आहेत. एका उल्लेखनीय घटनाक्रमात हिंदू आणि शीख समुदायांचे प्रतिनिधित्व करणारे माजी संसद सदस्य नरेंद्र सिंह हे अलिकडेच कॅनडातून अफगाणिस्तानात परतले आहेत. पूर्वीच्या शासनकाळात टोळीप्रमुखांकडून हडपण्यात आलेल्या संपत्ती मूळ मालकांना परत करण्यासाठी न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्यात आल्याची माहिती तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी दिली आहे.
अफगाणिस्तानात ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानची राजवट आल्यावर मोठ्या संख्येत शीख आणि हिंदूंनी देश सोडला होता. यात नरेंद्र सिंह खालसा यांचाही समावेश होता. भारतीय वायुदलाने अफगाणिस्तानातून बाहेर काढलेल्या पहिल्या समुहात खालसा सामील होते. त्यानंतर ते कॅनडा येथे गेले होते. भारताने अद्याप तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. परंतु दोन्ही बाजूंमध्ये आता पडद्याआड चर्चा होत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
विदेश मंत्रालयात पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण डेस्क हाताळणारे संयुक्त सचिव जे.पी. सिंह यांनी 7 मार्च रोजी काबूलचा दौरा केला होता. तालिबानचे विदेशमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यासोबत त्यांनी इस्लामिक स्टेटला रोखण्यासमवेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. अफगाणिस्तानात हिंदू आणि शीखांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे एक टक्के होते. परंतु 1970 च्या दशकाच्या अखेरीस अफगाणिस्तानात सुरू झालेली राजकीय उलथापालथ आणि सोव्हियत आक्रमणादरम्यान या समुदायांनी तेथून पलायन करण्यास सुरुवात केली होती.