देशभरातील हिंदूंनी संघटित व्हावे !
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवनकल्याण यांची हाक, बांगला देशातील अत्याचार थांबविण्याची मागणी
वृत्तसंस्था/विजयवाडा
बांगला देशात हिंदूवर अनन्वित अत्याचार होत असून ते त्वरित थांबविण्यात आले पाहिजेत, असा घणाघात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी केला आहे. सन्मानाने रहायचे असेल तर भारतातील आणि जगभरातील हिंदूंना संघटित व्हावे लागेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले. बांगला देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा एकमुखी निषेध भारतातील हिंदूंनी एकत्रितरित्या केला पाहिजे. बांगला देशच्या निर्मितीत भारताचे महत्वाचे योगदान आहे. तसेच भारताच्या सैनिकांनी बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले रक्त सांडले आहे. या उपकारांची जरातरी आठवण त्या देशाच्या सध्याच्या नेतृत्वाने ठेवावयास हवी. त्या देशाच्या अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस यांनी त्वरित तेथे होणारे हिंदूंवरील अत्याचार थांबवावयास हवेत, असे आवाहन त्यांनी केले. धर्मांधांना रोखण्याचे प्रयत्न त्यांनी न केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली.
संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करावा
संयुक्त राष्ट्रसंघाने बांगला देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी हस्तक्षेप करावा, असे आवाहन पवन कल्याण यांनी केले आहे. बांगला देशातील इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मोय कृष्ण दास यांच्या अटकेचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. हिंदूंची गळचेपी त्या देशात कोणत्या थराला गेली आहे, याचे प्रत्यंतर या अटकेतून येते. दास यांना जामीनही मिळू दिला गेला नाही. बांगला देशात कायद्याचे राज्य नसून धर्मांधांनी या देशाचा ताबा घेतला आहे अशा अर्थाची टीका त्यांनी केली.
अटकेचा निषेध करा
इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मोय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध सर्व हिंदूंनी एकत्रितरित्या करावा. या अडचणीच्या परिस्थितीत हिंदूंची एकात्मता महत्वाची आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या सैनिकांनी प्राणार्पण केले आहे. त्या देशात जर हिंदूंची अशी अवस्था होत असेल तर ही गंभीर बाब आहे. ही परिस्थिती हिंदूंच्या एकात्मतेमुळेच नाहीशी होऊ शकेल असे आवाहन त्यांनी केले.
शेख हसीनांच्या राजवटीनंतर...
बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची राजवट कोसळल्यानंतर तेथील प्रशासनावर प्रभाव टाकण्याची संधी धर्मांधांना मिळाली आहे. त्यामुळे तेथील सत्तासंघर्षाशी कोणताही संबंध नसलेला हिंदू समाज मात्र विनाकारण होरपळून निघत आहे. अनेक हिंदूंची घरे आणि मालमत्ता जाळल्या गेल्या असून प्रशासनाकडूनही त्यांना संरक्षण मिळेनासे झाल्याची तेथील स्थिती आहे. शेख हसीना यांच्या राजवटीत तेथील हिंदूंची परिस्थिती इतकी दयनीय नव्हती. प्रशासनही हिंदूंच्या सुरक्षेसंदर्भात आतापेक्षा अधिक सजग होते. आता स्थिती बिघडली आहे.
भारताची तीव्र प्रतिक्रिया
बांगला देशात झालेल्या माजी इस्कॉन प्रमुखांच्या अटकेचा तीव्र निषेध भारताने केला आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने बांगला देशला इशारा दिला असून हिंदू आणि अन्य अल्पसंख्य समाजांवरील अत्याचार त्वरित रोखा असा संदेश दिला आहे. बांगला देशच्या प्रशासनाने हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करावी, असा स्पष्ट आग्रह भारताने बांगला देशला कळविला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. बांगला देशातील हिंदू शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्या आंदोलनावर धर्मांधाकडून हल्ले होत आहेत, ही गंभीर परिस्थिती आहे. हिंदूंना सुरक्षा देणे ही तेथील प्रशासनाचे उत्तरदायित्व असून ते त्यांना पार पाडावे लागणार आहे, असे प्रतिपादन विदेश व्यवहार विभागाने केले आहे. बांगला देशातील स्थिती सुधारण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात असून, भारत अधिक काळ गप्प बसू शकणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.