बांगलादेशात हिंदू महिलेवर सामूहिक बलात्कार
बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप : देशभरात तीव्र निदर्शने वृत्तसंस्था
ढाका
बांगलादेशात हिंदू महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आक्रोश निर्माण झाला आहे. या प्रकरणी बांगलादेशात तीव्र निदर्शने सुरू झाली आहेत. बांगलादेशातील हिंदू समुदाय रस्त्यांवर उतरून न्यायाची मागणी करतोय. तर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ढाका येथील सैयदाबादमध्ये छापेमारीदरम्यान मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांनाही पकडण्यात आल्याची माहिती कुमिला जिल्ह्याचे पोलीस अधिकारी नजीर अहमद खान यांनी दिली. ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत या सामूहिक बलात्काराच्या घटनेची निंदा केली.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे सचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच उच्च न्यायालयाने पीडितेशी संबंधित सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटविण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पीडितेला सुरक्षा पुरविणे आणि आवश्यक उपचार उपलब्ध करविण्याचे निर्देश दिले आहेत. तर सामूहिक बलात्काराच्या घटनेवेळी पीडितेच्या शेजाऱ्यांनी कथित स्वरुपात आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचे समोर आले आहे.
कुमिला जिल्ह्यातील मुरादनगर येथील स्वत:च्या आईवडिलांच्या घरी ही युवती आली होती. तेव्हाच काही लोक रात्री दरवाजा तोडून घरात शिरले. त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यासह याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तर पीडितेच्या शेजाऱ्यांचाही या प्रकरणात हात असल्याचे समजते.
युनूस सरकार लक्ष्य
बांगलादेशात सत्तापालटाला 11 महिने पूर्ण झाले आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीब अहमद वजीद यांनी या घटनेची कठोर निंदा केली. मगील 11 महिन्यांमध्ये बांगलादेशात मॉब लिंचिंग अन् अल्पसंख्याकांवरील अत्याचार वाढले असून याकरता मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार जबाबदार असल्याचे वजीद यांनी म्हटले आहे.