अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिरात तोडफोड
भारताकडून कठोर निंदा : कठोर कारवाई करण्याची गरज
वृत्तसंस्था/ चिनो हिल्स
अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये कथित ‘खलिस्तानी जनमत चाचणी’च्या काही दिवस अगोदर कॅलिफोर्नियाच्या चिनो हिल्स येथील बीएपीएस हिंदू मंदिरात तोडफोडीची घटना घडली आहे. याचबरोबर मंदिराच्या भिंतीवर आक्षेपार्ह घोषणा समाजकंटकांनी लिहिल्या आहेत. बीएपीएसच्या अधिकृत पेजने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. तसेच द्वेषाला कधीच थारा देणार नाही आणि करुणा कायम राहणार असे बीएपीएसने नमूद केले आहे.
आणखी एका मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियाच्या बार चिनो हिल्स येथील हिंदू समुदाय द्वेषाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुदायासोबत मिण्tन आम्ही कधीच द्वेषाला मूळ रोवू देणार नाही. आमची संयुक्त मानवता आणि श्रद्धा शांतता आणि करुणा कायम राहिल हे निश्चित करणार असल्याचे बीएपीएसने म्हटले आहे.
मंदिरांच्या भिंतीवर आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यात ‘हिंदूंनी परत जावे’ असा संदेश देखील नमूद आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर समाजकंटकांकडून लिहिण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे स्थानिक हिंदू समुदाय चिंतेत असला तरीही याच्या प्रत्युत्तरादाखल समुदायाने एकजूट होण्याचा संकल्प घेतला आहे. हे कृत्य अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांनी केल्याचे प्रथमदर्शनी मानले जात आहे. लॉस एंजिलिस येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कथित जनमतचाचणीपूर्वी उपद्रव दाखवून देण्याचा हा प्रकार खलिस्तान समर्थकांनी केला असल्याचे मानण्यात येत आहे.
भारतीय विदेश मंत्रालयाची प्रतिक्रिया
भारताने मंदिरातील तोडफोडीच्या घटनेची कठोर शब्दांत निंदा केली आणि या घटनेत सामील लोकांच्या विरोधात ‘कठोर कारवाई’ची मागणी केली आहे. आम्ही कॅलिफोर्नियाच्या चिनो हिल्समधील एका हिंदू मंदिरात तोडफोडीविषयी वृत्त पाहिले आहे. हिंदू मंदिरांमध्ये झालेल्या क्रौर्याला आम्ही सहन करणार नाही. अशाप्रकारच्या घृणास्पद कृत्यांची आम्ही कठोर शब्दांत निंदा करतो असे भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे. स्थानिक कायदा अंमलबजाणी अधिकाऱ्यांना या कृत्यांसाठी जबाबदार लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आणि पूजास्थळांना पुरेशी सुरक्षा देण्याचे आवाहन करतो असे वक्तव्य जायसवाल यांनी केले.
यापूर्वीही असे प्रकार
अमेरिकेतील हिंदूंच्या संघटनेने सोशल मीडियावर या घटनेची माहिती शेअर केली आणि कॅलिफोर्नियातील प्रतिष्ठित बीएपीएस मंदिरात तोडफोड ही लॉस एंजिलिस येथील कथित खलिस्तान जनमत चाचणीपूर्वी झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. 2022 पासून हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड आणि अन्य प्रकारच्या घडलेल्या घटनांची यादी देत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. मागील वर्षी देखील अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात 25 सप्टेंबर रोजी समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली होती. न्यूयॉर्कच्या बीएपीएस मंदिरात अशाचप्रकारची घटना त्याच्या 10 दिवसांनी घडली होती.