फ्रान्समधील हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज
पॅरिसमध्ये साकारले स्वामीनारायण मंदिर : सप्टेंबरमध्ये 13 दिवस चालणार भारतीय सांस्कृतिक महोत्सव
वृत्तसंस्था/ पॅरिस
अबू धाबीनंतर आता फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये साकारण्यात आलेल्या एक भव्य-दिव्य हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. पॅरिसच्या उपनगरातील बुसी-सेंट-जॉर्जेस येथे भव्य बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये होणार असून 2 ते 14 सप्टेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 13-दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात म्हणजेच पॅरिस मंदिर महोत्सवात, मंदिराचे उद्घाटन केले जाईल. बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी समर्पित असलेल्या या कार्यक्रमाला जगभरातील भक्त आणि हितचिंतक उपस्थित राहणार आहेत.
फ्रान्सची राजधानी पॅरिसचे उपनगर असलेल्या बुसी-सेंट-जॉर्जेस येथील भव्य बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिर आता आपल्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या उंबरठ्यावर आहे. पॅरिसमधील स्वामीनारायण मंदिर फ्रान्समधील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर आहे. हे बुसी-सेंट-जॉर्जेस येथील ‘एस्प्लानेड डेस रेलिजियन्स एट डेस कल्चर्स’वर बांधण्यात आले असून याठिकाणी विविध धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. हे स्थळ धार्मिक विविधता आणि आंतरधर्मीय सलोख्याचे प्रतीक म्हणून विकसित करण्यात आले आहे. ‘बीएपीएस पॅरिस’च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये महंत स्वामी महाराजांपासून ते जगभरातील ज्येष्ठ संत आणि भक्तांपर्यंत सर्वांनी मिळून केलेल्या ‘पॅरिस टेम्पल फेस्टिव्हल की जय!’ या एकमुखी घोषणेचा उल्लेख आहे. ही भावना मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी असलेल्या सामूहिक उत्साहाशी आणि आध्यात्मिक एकतेशी जोडलेली आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सध्या मंदिराच्या कळसांवर आणि मध्यवर्ती घुमटावर कलश आणि ध्वजदंड पूजनासह पारंपरिक वैदिक विधी पार पाडले जात आहेत. साधू, संत आणि भक्तगण मंदिराच्या आवारात वैदिक मंत्रांचे पठण करत असून शांतता, सलोखा आणि लोककल्याणासाठी प्रार्थना करत आहेत. फ्रान्समधील अनेक भारतीय कुटुंबे आपल्या मुला-नातवंडांसोबत या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. या महोत्सवादरम्यान पॅरिस शहरात नगर प्रदक्षिणा, बुसी-सेंट-जॉर्जेस येथे पालखी यात्रा, दररोज वैदिक महायज्ञ, मूर्ती-प्रतिष्ठापना सोहळा, समर्पण सभा आणि कीर्तन आराधना यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातही हे मंदिर केवळ पूजेसाठीच नसेल; येथे सांस्कृतिक आणि सामुदायिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल, असे सांगण्यात आले.
भारतीय हस्तकला परंपरांचा वापर
मंदिराच्या वास्तुकलेत शतकानुशतके जुन्या भारतीय हस्तकला परंपरांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरात भारतातून आयात केलेल्या विशेष दगडांचा वापर करण्यात आला आहे. हे दगड भारतातील सुमारे 1,000 वर्षे जुन्या कोरीव तंत्राचा वापर करून घडवण्यात आले आहेत. कारागिरांनी अनेक भागांवर गुंतागुंतीचे हस्तशिल्प केले आहे. मंदिराचे दगड भारतात कोरले गेल्यानंतर फ्रान्समध्ये आणले गेले. त्यानंतर ते भारतीय कारागीर आणि फ्रेंच तज्ञांच्या मदतीने मंदिरात स्थापित करण्यात आले.
1970 मध्ये मंदिर बांधण्याची कल्पना उदयास
बीएपीएस पॅरिसच्या वेबसाईटनुसार, फ्रान्समध्ये हिंदू मंदिर बांधण्याची कल्पना 1970 मध्ये उदयास आली. सुमारे 25 वर्षांनंतर 1995 मध्ये पॅरिसमध्ये मंदिर बांधण्याच्या योजनेवर काम पुढे सरकले. 2017 मध्ये, बुसी-सेंट-जॉर्जेस येथे मंदिरासाठी जमीन संपादित करण्यात आली. 2021 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे 56 वर्षांनंतर 2026 मध्ये हे मंदिर आता तयार आहे.
पायाभरणीनंतर पाच वर्षात उभारणी
मंदिराचा ऐतिहासिक पायाभरणी सोहळा सप्टेंबर 2022 मध्ये पार पडला. यानंतर, जून 2024 मध्ये मंदिराच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. आता 2026 मध्ये मंदिर पूर्णपणे साकारले गेले आहे. आता आयोजित करण्यात आलेला हा मंदिर महोत्सव केवळ एका धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित राहणार नाही. ‘बीएपीएस’ने भारतीय संस्कृती, अध्यात्म, कला आणि विविध समुदायांमधील सलोखा दर्शवणारा एक जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून तो सादर केला आहे. पॅरिससारख्या जागतिक सांस्कृतिक केंद्रामधील भारतीय पारंपरिक वास्तुकला आणि हिंदू आध्यात्मिक परंपरेचे हे नवीन केंद्र भारतीय समुदायासाठी निश्चितच विशेष महत्त्वाचे ठरेल. सप्टेंबरमधील हा मंदिर महोत्सव या दीर्घ बांधकाम प्रवासाची पूर्तता आणि एका नव्या पर्वाची सुरुवात दर्शवेल.