हिंदु संस्कृती जपल्यानेच हिंदुराष्ट्र वाढेल! ऑलिंपिकवीर स्वप्निल कुसाळे याचं विधान
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने हिंदू राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवाहन केले आहे. बालेवाडी-हिंजवडी येथे मंगळवारी अमोल बालवडकर यांच्या दहीहंडी कार्यक्रमात स्वप्नील कुसाळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना आहाराचे महत्त्व पटवून देत घरचे शिजवलेले व पौष्टिक जेवण घेण्याचेही आवाहन केले.
स्वप्नील कुसाळे म्हणाले, “मी पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आम्ही सर्वजण जय श्री राम म्हणतो आणि घोषणाबाजी करतो. त्यापलीकडे जायला हवे. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे आणि आपण मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून आपले हिंदूराष्ट्र मजबूत होईल."
तो पुढे म्हणाला, “दहीहंडीसारखा खेळ खेळण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. ती उंची गाठून हंडी फोडणे हे कौतुकास्पद आहे, कारण त्यामागे खूप मेहनत आहे. तरुणांनी चांगले खाणे गरजेचे आहे. बाहेरचे अन्न टाळावे. घरचे जेवण वेळेवर खावे आणि पौष्टिक असावे.” यावेळी स्वप्नीलचा सत्कार करून त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.