अमेरिकेत हिंदू पोलीस अधिकाऱ्याची हत्या, सहकारी गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ लॉरेंसविले
अमेरिकेच्या अटलांटामध्ये एका हिंदू पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस अधिकारी एका हॉटेलमध्ये चौकशीसाठी स्वत:च्या सहकाऱ्यासोबत गेला होता. तेथे एका इसमाने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अटलांटापासून 40 किलोमीटर अंतरावरील स्टोन माउंटेननजीक ही घटना घडली असल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले आहे.
हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी एक इसम बनावट कागदपत्रे सादर करत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. ज्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी हॉटेलमध्ये पोहोचले होते. आरोपीने पोलिसांना स्वत:च्या रुममध्ये बोलाविले, त्यानंतर अचानक बंदूक बाहेर काढत गोळीबार सुरू केला. यात अधिकारी प्रदीप तमांग यांचा मृत्यू झाला. तमांग हे मूळचे नेपाळी असून ते मागील वर्षीच पोलीस विभागात सामील झाले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर संबंधित भागात सुरक्षा वाढविण्यात आली असून याप्रकरणी तपास केला जात आहे.