हिंदू साधूला बांगला देशात जामीनही नाही
भारताने घेतली गंभीर दखल : त्वरित सुटका करण्याची करण्यात आली मागणी
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशाच्या इस्कॉन संस्थेचे प्रमुख आणि त्या देशातील प्रमुख हिंदू साधू चिन्मोय कृष्ण दास यांना जामीनही नाकारण्यात आला आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांना अटक केलेली नसून त्यांचे बांगला देश प्रशासनाने अपहरण केले आहे. अपहरणानंतर त्यांना अटक केल्याचे नाटक रंगविण्यात आले, असा आरोप तेथील हिंदू संघटनांनी केला आहे. दास यांच्यावर ठेवण्यात आलेला देशद्रोहाचा आरोप धादांत खोटा असून त्यांची सुटका करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल भारताने घेतली आहे. त्यांच्यावरील खोटे आरोप मागे घेण्यात यावेत आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, असा संदेश भारताच्या विदेश विभागाने बांगला देशाच्या प्रशासनाला पाठविला आहे. तसेच बांगला देशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण केले जावे, अशी मागणीही भारताकडून बांगला देशाच्या प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक समुदायांवर अत्याचार
बांगला देशात सध्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर अत्याचार केले जात आहेत. बांगला देशातील धर्मांधांकडून हिंदूंची घरे आणि मालमत्ता लुटली जात आहे. महिलांचा छळ केला जात आहे. बांगला देशाच्या प्रशासनाने या बाबी गंभीरपणे घ्याव्यात आणि हिंदूंसह तेथील अल्पसंख्याकांना शांतता आणि सुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करावी. ते त्या प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे, असे भारताने आपल्या संदेशात पुढे स्पष्ट केले आहे.
बांगला देशात जोरदार निदर्शने
कृष्ण दास यांना अटक झाल्यानंतर बांगला देशातील हिंदू रस्त्यांवर उतरले आहेत. त्या देशाच्या अनेक शहरांमध्ये हिंदूंकडून मोर्चे काढण्यात येत असून सरकारी कार्यालयांवर निदर्शने करण्यात येत आहेत. लक्षावधी हिंदूंनी त्यांच्या सुटकेसाठी बांगला देशाच्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. जवळजवळ सर्व हिंदू संघटनांनी या मोर्चांमध्ये आणि निदर्शनांमध्ये भाग घेतला.
ढाका शहरात प्रचंड मोर्चा
कृष्ण दास यांच्या अटकेमुळे बांगला देशमधील हिंदू समाजात प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली असून ढाका शहरात सोमवारी प्रचंड निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात किमान एक लाख हिंदूंचा समावेश होता. कृष्ण दास यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
काय आहे प्रकरण...
चिन्मोय कृष्ण दास हे इस्कॉन या हिंदू संस्थेचे माजी अध्यक्ष होते. त्यांना 25 नोव्हेंबरला, ढाका विमानतळावरून बांगला देश पोलिसांनी अटक केली होती. पण ही अटक केवळ नौटंकी असून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे प्रतिपादन तेथील सनातनी धर्म संस्थेने केले आहे. कारागृहात त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी चिंता सनातनी धर्मसंस्थेने व्यक्त केली होती. दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद केल्याने त्यांना लवकरात सुटणे अशक्य होईल, अशीही चिंता बांगला देशातील हिंदूंकडून व्यक्त केली जात आहे.