बांगलादेशात हिंदूला पेट्रोल ओतून जाळले
मारहाण, चाकूहल्ला केल्याचेही स्पष्ट : वाढत्या घटनांमुळे भारत संतप्त
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशात हिंदूंविरोधी हिंसाचार अजूनही सुरू आहे. शरीयतपूर जिह्यात खोकॉन चंद्रा नावाच्या एका हिंदू व्यक्तीवर जमावाने हल्ला करून जिवंत जाळले. सदर हिंदू व्यक्तीवर जमावाने जीवघेणा हल्ला केला. सुरुवातीला त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली, नंतर चाकूने मारहाण करून पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची द्वेषपूर्ण घटना उघडकीस आली आहे. या सर्व अवहेलनांमधून बचावासाठी खोकॉन चंद्रा याने जवळच्या तलावात उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही निदर्शनास आले आहे. या हल्ल्याने पुन्हा एकदा बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराची व्याप्ती अधोरेखित केली.
बांगलादेशात मागील दोन आठवड्यांपासून अशांतता सुरूच आहे. अलिकडच्या काळात हिंदूवर झालेला हा चौथा हल्ला आहे. वारंवार घडलेल्या या घटनांमुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदूंवर होणारे हे हल्ले तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. बांगलादेशात यापूर्वी, बेजेंद्र बिस्वास, अमृत मंडल आणि दीपू चंद्रा दास यांनाही जमावाने ठार मारले होते. या घटना देशात धार्मिक हिंसाचाराच्या वाढीचे प्रतिबिंब दर्शवतात. यापूर्वी सोमवारी, बेजेंद्र बिस्वास नावाच्या एका हिंदू तरुणाला त्याच्या सहकाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. 24 डिसेंबर रोजी बांगलादेशातील कालीमोहर युनियनमधील हुसेनडांगा भागात 29 वर्षीय अमृत मंडल या आणखी एका हिंदू तरुणाला जमावाने मारहाण करून ठार मारल्याचा आरोप आहे. 18 डिसेंबर रोजी, मयमनसिंगमधील भालुका येथील त्याच्या कारखान्यातील एका मुस्लीम सहकाऱ्याने ईश्वरनिंदेचा खोटा आरोप केल्यानंतर 25 वर्षीय हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांची जमावाने निर्घृण हत्या केली होती.