For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या

06:57 AM Apr 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या
Advertisement

अपहरण केल्यानंतर मारहाण : भारताकडून घटनेचा कडक शब्दात निषेध

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशमध्ये एका प्रमुख हिंदू नेत्याची अज्ञात लोकांनी हत्या केली. भावेश चंद्र रॉय (58) असे संबंधिताचे नाव असून अपहरण केल्यानंतर झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. ते बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष होते. हिंदू समाजात त्यांची चांगली पकड होती. ते ढाक्यापासून 330 किमी अंतरावर असलेल्या दिनाजपूरमधील वासुदेवपूर गावचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

भावेश रॉय यांचे गुरुवारी दुपारी त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले आणि मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पत्नी शांतना यांनी सांगितले. सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींवरून चार जण घरी आले आणि त्यांनी पतीला जबरदस्तीने उचलून नेले, असेही पत्नीने स्पष्ट केले आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आपल्या पतीला फोन आला. फोन करणाऱ्याला फक्त भावेश घरी आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते. फोन केल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने 5 वाजता चार पुरुष दोन मोटारसायकलींवरून आले आणि पतीला घराबाहेर घेऊन गेले, असे त्या म्हणाल्या.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भावेश रॉय यांना जवळच्या नाराबारी गावात नेऊन तिथे क्रूरपणे मारहाण करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळीच हल्लेखोरांनी भावेश यांना बेशुद्ध अवस्थेत व्हॅनमधून त्याच्या घरी पाठवले. त्यानंतर त्यांना प्रथम जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारार्थ दिनाजपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांची पोलिसात धाव

भावेश यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली आहे. हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू  असल्याचे बिरल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अब्दुस सबूर यांनी सांगितले. तसेच पोलीस संशयितांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी काम करत आहेत. आपण दोन हल्लेखोरांना ओळखू शकते, असा दावा भावेश यांच्या पत्नीने केला आहे.

भावेश चंद्र रॉय यांची ओळख

मृत व्यक्तीची ओळख 58 वर्षीय भावेश चंद्र रॉय अशी झाली आहे. ते ढाक्यापासून सुमारे 330 किलोमीटर वायव्येस असलेल्या दिनाजपूरमधील वासुदेवपूर गावात राहत होते. भावेश चंद्र रॉय हे बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष होते.

बांगलादेशने सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करावे : भारत

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक नेते भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण आणि हत्येची माहिती आम्हाला मिळाली आहे. ही हत्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या काळात हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या छळाचा एक नमुना असल्याचे दिसून येते. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून आरोपी कोणत्याही शिक्षेशिवाय मुक्तपणे फिरत असतात. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा अंतरिम सरकारला आठवण करून देतो की त्यांनी कोणतेही निमित्त न सांगता किंवा भेदभाव न करता हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही भारताने वेधले लक्ष

भारताने शुक्रवारीही बांगलादेशला पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर नैतिक उपदेश देण्याऐवजी स्वत:च्या देशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या प्रसारमाध्यम सचिवांनी मुर्शिदाबादमधील हिंसाचारावर केलेल्या भाष्यानंतर भारताने बांगलादेशला खडे बोल सुनावले होते.

Advertisement
Tags :

.