बांगलादेशात पेटविली हिंदूंची घरे
परिस्थितीत आणखीनच बिघाड, कारवाईची मागणी
वृत्तसंस्था / ढाका (बांगलादेश)
बांगलादेशातील पिरोजपूर आणि चट्टोग्राम येथे हिंदूंच्या अनेक घरांना आगी लावण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे या देशातील परिस्थिती आणखी बिघडली आहे. काही दिवसांपूर्वी या देशातील युवा नेता ओस्मान हादी याची हत्या झाली होती. ही हत्या अवामी लीगच्या कार्यकर्त्याने केली, असा आरोप हादी याच्या भावाने केला आहे. मात्र, या हत्येचा राग विनाकारण हिंदूंवर काढला जात असून त्यामुळे या समाजाचे जीवित आणि वित्त अधिकच धोक्यात आल्याचे दिसत आहे.
पिरोजपूर भागातील डुमरीतोला या खेड्यात हिंदूंच्या अनेक घरांना आगी लावण्यात आल्या आहेत. हे प्रकार 27 डिसेंबरपासून घडत आहेत. पोलिसांनी अद्यापही आगी लावणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई न केल्याने हे प्रकार अधिक प्रमाणात होत आहेत. हिंदूंना बेघर करून त्यांना देशातून घालवून देण्याचे हे कारस्थान आहे, असा आरोप बांगलादेशातील अनेक हिंदू संघटनानी केला आहे.
कसाबसा वाचविला जीव
या खेड्यातील हिंदू आणि अल्पसंख्य समुदायांच्या लोकांनी त्यांच्या घरांना आग लावल्यानंतर पळून जाऊन कसाबसा जीव वाचविला आहे. तथापि, त्यांच्या घरांसमवेत त्यांची सर्व चीजवस्तू आणि संसारसाधने भस्मसात झाली आहेत. अशा स्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यांची गुरेढोरेही या अग्निकांडात जळून गेल्याने त्यांच्यासमोर चरितार्थाचा प्रश्न उभा राहिला आहे.
रावजान येथील जाळपोळ
रावजान भागातही गेल्या पाच दिवसांमध्ये हिंदूंची सात घरे जाळण्यात आली आहेत. हा दंगल करण्याचा नवा प्रकार आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक गावकरी आणि गावातील नेते यांच्याशी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. पाच दंगलखोरांना अटकही करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन हिंदूंची हत्या
गेल्या एका आठवड्यामध्ये बांगलादेशात दोन हिंदू युवकांची हत्या करण्यात आली आहे. दिपू चंद्र दास आणि अमृत मेंडाल अशी त्यांची नावे आहेत. मेंडाल याच्या हत्येला खंडणी वसुलीशी जोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. तथापि, खंडणीवसुलीचा आरोप बनावट असून पोलीस त्यांचे अपयश झाकण्यासाठी त्याला या प्रकरणाशी जोडत आहेत, असाही आरोप केला जात आहे. शेख हसीना यांचे सरकार पाडविण्यात आल्याने या देशात एक राजकीय पोकळी निर्माण झाली असून तिचा गैरफायदा धर्मांध शक्तींना मिळत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.