उत्तर प्रदेशात ‘हिंदू गौरव दिन’ आयोजित
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशात बुधवारी दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याणसिंग यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कल्याणसिंग यांची पुण्यतिथी ‘हिंदू गौरव दिन’ म्हणून पाळण्यात आली. या कार्यक्रमाला सहस्रावधी लोकांची उपस्थिती होती. आदित्यनाथ यांनी कल्याणसिंग यांच्या कार्याचे महत्व विशद केले. अथक संघर्षातूनच कल्याणसिंग यांच्यासारखे व्यक्तीमत्व निर्माण होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. 1991 मध्ये कल्याणसिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
अखिलेश यादव यांच्या तोंडातून कल्याणसिंग यांच्यासंबंधी एक चांगला शब्द त्यांच्या पुण्यतिथीदिवशीही निघत नाही. मात्र ज्यांनी सातत्याने हिंदूंचा द्वेष केला अशा मुख्तार अन्सारी यांच्यासारख्या गुंडांसंबंधी मात्र यादव प्रशंसोद्गार काढतात. त्यांना जवळ करतात. यावरुन त्यांचे धोरण आणि मनोवृत्ती कळून येते. उत्तर प्रदेशची सूज्ञ जनता अशा नेत्यांना कधीही जवळ करणार नाही. कल्याणसिंग यांच्या मार्गावरुन भारतीय जनता पक्ष चालत राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.