प्रार्थना आक्षेपार्ह वाटल्याने हिंदू एकताने विचारला जाब
एका उपनगरातील शाळेतील घटना
यापुढे शाळेत संबंधित प्रार्थना घेणार नाही, शाळेचे लेखी पत्र
कोल्हापूर
उपनगरातील एका शाळेत हिंदी प्रार्थना घेतली जाते. याबद्दल हिंदू एकताकडे पालकांनी तक्रार केली होती. ती प्रार्थना आक्षेपार्ह वाटल्याने हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्यातील निरीक्षक अजयकुमार शिंदकर यांनी शाळेत हजेरी लावली. सर्व वातावरण शांत झाल्यानंतर शाळा प्रशासनाच्या वतीने येथून पुढे संबंधित प्रार्थनाच शाळेत घेतली जाणार नाही, असे लेखी पत्र पोलीस प्रशासनासह हिंदू एकताला दिले. त्यानंतर वादावर पडदा पडला.
हिंदू एकताचे कार्यकर्ते शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांबद्दल आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे हिंदू ऐकताचे दीपक देसाई यांनी सांगितले. तर मुख्याध्यापक म्हणाले, मी शाळेत रूजू होण्यापूर्वीपासून संबंधित प्रार्थना घेतली जाते. या तक्रारीनंतर यापुढे ही प्रार्थना घेतली जाणार नसल्याचे सांगितले. पालकांच्या तक्रारीमुळे आक्रमक झालेल्या हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शांत केले. यावेळी हिंदू एकताचे दीपक देसाई, गजानन तोडकर, उदय भोसले, ओंकार रजपूत, स्वप्नील कोडक, भास्कर कोरवी, विकास जाधव आदी उपस्थित होते.