‘सेरेंडिपिटी’ महोत्सवात हिंदू संस्कृतीला डावलले
जनजागृती समितीकडून कानउघाडणी : मंदिरांविषयी सचित्र माहितीफलक प्रदर्शित
पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवाच्या आयोजकांकडून गोव्यातील हिंदूंची थट्टा आणि अपमान करण्यासारखी कृत्ये होऊ लागली आहेत. सध्या सुरू असलेल्या एका प्रदर्शनातून असाच प्रकार उघडकीस आला. त्यावर हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला. त्यानंतर आयोजकांकडून माफी मागण्यात येऊन चूक सुधारण्यात आली. ‘सेरेंडिपिटी आर्ट फाऊंडेशन’च्या वतीने 15 डिसेंबरपासून सेरेंडिपिटी कला महोत्सव पणजीत आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विविध विषयांवर प्रदर्शने भरवण्यात आली आहेत.
त्यात गोव्याच्या जीवनपद्धतीवर आधारित प्रदर्शनाचा समावेश आहे. येथील वन खात्याच्या उद्यानात भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात येथील मोठमोठ्या चर्चेस, फोंडा येथील साफा मशिद, आदी धार्मिक स्थळांची छायाचित्रांसह माहिती देण्यात आली होती. मात्र संपूर्ण प्रदर्शनात गोव्यातील हिंदू संस्कृती अथवा एकाही मंदिराला स्थान देण्यात आलेले नव्हते. सदर प्रकार हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते महेश प्रभु यांच्या लक्षात आला असता त्यांनी तो प्रकार ‘महोत्सवा’च्या आयोजकांच्या लक्षात आणून दिला व त्याविषयी त्यांचे प्रबोधन केले. संबंधित अधिकाऱ्यांनी नंतर महोत्सवाचे ‘क्युरेटर’ अक्षय महाजन यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.
त्यानुसार समितीचे उत्तर गोवा समन्वयक गोविंद चोडणकर आणि महेश प्रभु यांनी सदर बाब महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार प्रदर्शनात गोव्यातील विविध मंदिरांची छायाचित्रे आणि माहिती असलेला एक फलक प्रदर्शित करण्यात आला. एवढेच नव्हे तर पुढील वर्षीच्या प्रदर्शनात जनजागृती समितीलाच येथील हिंदू संस्कृती आणि मंदिरे याविषयी माहिती देण्याची संधी देणार असल्याचे आश्वासन दिले. याकामी महाजन यांच्याशी संपर्क साधण्यात उद्योजक सदानंद ठाकूर यांनी समितीला मोलाचे सहकार्य केले तसेच मंदिरांविषयीचा फलक प्रदर्शित होईपर्यंत त्याविषयी संबंधितांकडे पाठपुरावाही केला.