For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदू कार्यकर्त्यांना पाकिस्तानमध्ये धमक्या

06:06 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंदू कार्यकर्त्यांना पाकिस्तानमध्ये धमक्या
Advertisement

धर्मांतराला विरोध केल्याबद्दल फतवाही जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हक्कांसाठी काम करणारे हिंदू कार्यकर्ते शिवा कच्छी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत एका इस्लामिक संघटनेकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे सांगितले. हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध बोलल्याबद्दल त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा कच्छी यांनी केला आहे. सरकार आणि पोलीस या प्रकरणात मौन बाळगत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

Advertisement

शिवा कच्छी हे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हक्क संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानशी संबंधित धर्मगुरूंनी त्यांच्याविरुद्ध फतवा काढला असून त्यामध्ये त्यांच्या हत्येचे आवाहन केले आहे. आपल्यावरील अन्यायाबाबत कच्छी यांनी वारंवार संघीय सरकार, सिंध सरकार आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यानंतर आता त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ, युएन मानवाधिकार परिषद, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्यूमन राईट्स वॉच आणि अमेरिकन परराष्ट्र विभाग यांना टॅग करत मदत करण्याचा आग्रह व्यक्त केला. ‘जर मला किंवा माझ्या कुटुंबाला कोणतेही नुकसान झाले तर पाकिस्तानी सरकार पूर्णपणे जबाबदार असेल.’ असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्याला तात्काळ सुरक्षा पुरवावी, धमक्या देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी आणि पाकिस्तानमधील फतव्याचे राजकारण बंद करण्याची मागणीही केली.

शिवा कच्छी यांनी सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदू मुली आणि विवाहित महिलांचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या घटनांचे दीर्घकाळ दस्तऐवजीकरण केले आहे. यावरूनच त्यांनी ‘इस्लामविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानात उमरकोट जिल्हा हा पाकिस्तानचा एकमेव हिंदू बहुल जिल्हा आहे. 2023 च्या जनगणनेनुसार, त्याच्या लोकसंख्येपैकी अंदाजे 52 टक्के हिंदू आहेत. पाकिस्तानातील सुमारे 94 टक्के हिंदू सिंधमध्ये राहत असून त्यांची एकूण लोकसंख्या 40 ते 50 लाखांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

Advertisement
Tags :

.