For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडेनबर्ग अहवालाने पुन्हा खळबळ

06:20 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडेनबर्ग अहवालाने पुन्हा खळबळ
Advertisement

अदानी समूहाशी निगडीत ऑफशोअर कंपनीत सेबी प्रमुखांची हिस्सेदारी असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने आणखी एक अहवाल प्रसिद्ध करत पुन्हा देशात खळबळ उडवून दिली आहे. अदानी समूह आणि सेबी प्रमुख यांच्यात भागिदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीचे अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये हिस्सेदारी होती, असे हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात सेबी प्रमुखांची अदानी समूहातील कंपन्यांमधील हिस्सेदारी उघड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘राजकारण’ही सुरू झाले आहे. तसेच बाजार नियामक सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप फेटाळून लावताना त्यांनी याला चारित्र्य हत्येचा प्रयत्न म्हटले आहे.

Advertisement

हिंडेनबर्गने दस्तऐवजांचा हवाला देत सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि तिच्या पतीची एका ऑफशोअर फंडात गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते, असे हिंडेनबर्गने म्हटले आहे. व्हिसलब्लोअर दस्तऐवजांच्या आधारे बुच आणि तिच्या पतीचे मॉरिशस ऑफशोर कंपनी ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड’मध्ये हिस्सेदारी आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांनी ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंड’मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला आहे. हा पैसा अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा हिंडेनबर्गने केला आहे.

गेल्यावषी अदानी समूहावर आर्थिक अनियमितता आणि बाजारातील हेराफेरीचा आरोप करून हिंडेनबर्ग रिसर्च प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानीला 150 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाले होते. मात्र, सेबीने कोणतीही कारवाई केली नाही. अशा स्थितीत सेबीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता सेबीचे प्रमुख हे अदानी घोटाळ्याशी संबंधित ऑफशोर कंपन्यांचा एक भाग असल्याचे म्हणजेच या घोटाळ्यात सेबीचे प्रमुखही सहभागी आहेत, असा खुलासा हिंडेनबर्ग रिसर्चने पुराव्यानिशी केला आहे. अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी रात्री उशिरा अहवाल प्रसिद्ध केला.

माधबी बुच यांनी आरोप फेटाळले

माधवी बुच यांनी हिंडेनबर्ग अहवालात आपल्यावरील आरोपांना ‘निराधार’ आणि ‘चरित्र हत्येचा प्रयत्न’ असे वर्णन केले आहे. सेबीच्या अध्यक्षांनी सर्व आर्थिक नोंदी जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘आपले जीवन आणि वित्त हे एक खुले पुस्तक आहे’, असे त्यांनी पती धवल बुच यांच्यासमवेत केलेल्या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले. यापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्च गेल्यावषी अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांना हा नित्यक्रम चालू ठेवायचा असल्यानेच खोटे दावे केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अदानींना वाचवण्यासाठी मोदींनी रचले षड्यंत्र

तपास सोपवण्यात आलेली सेबी घोटाळ्यात सहभागी

हिंडेनबर्ग रिसर्च अहवालाची संसदीय चौकशीची मागणी

तपासाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जिवलग मित्राला (अदानी) वाचवण्याचा कट रचल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या मेगा घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फतच योग्य चौकशी होऊ शकते, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, मोदी सरकार जेपीसी स्थापन करण्यास तयार नाही. अदानींना पंतप्रधान मोदी किती दिवस वाचवू शकतील, एक दिवस पकडले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर हिंडेनबर्ग अहवालाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ‘एक्स’वर एक निवेदन जारी केले आहे. 2022 मध्ये सेबीचे प्रमुख झाल्यानंतर लगेचच माधबी पुरी बुच यांनी गौतम अदानी यांच्यासोबत दोन बैठका घेतल्याचा दावा त्यांनी केला. याचदरम्यान सेबी अदानींच्या व्यवहारांची चौकशी करत होती. अदानींशी संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्यात सेबीची अनास्था खूप दिवसांपासून सर्वांसमोर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीनेही याची दखल घेतली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार होते. मात्र, अचानक 9 ऑगस्ट रोजी ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. यामागेही वेगळेच कारण असल्याचे जयराम रमेश म्हणाले.

Advertisement
Tags :

.