गौतम खट्टरना हिमाचल पोलिसांनी घेतले ताब्यात
लवकरच गोव्यात आणले जाईल : वास्कोतील वादग्रस्त विधान प्रकरण
पणजी : वास्को येथे एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी गौतम खट्टर यांना हिमाचल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, गुन्हा शाखेचे एक पथक लवकरच त्यांना ताब्यात घेऊन गोव्यात आणणार आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई केली. गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हिमाचल प्रदेश पोलिसांनी काल शुक्रवारी संध्याकाळी कुलु जिह्यातून मुख्य संशयित गौतम खट्टर यांना ताब्यात घेतले आहे. गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर याच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावरून राज्यात मोठी खळबळ माजली होती.
राज्यतील विविध पोलिसस्थानकावर लोकांचा जमाव जाऊन खट्टर विरोधात तक्रार दाखल करीत होते आणि त्याला अटक करण्याची मागणी करीत होते. वास्को पोलिसस्थानकात खट्टर विरोधात गुन्हा नोंद केल्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे देण्यात आले होते. गुन्हा शाखेने याबाबत जलद गतीने तपास सुऊ केला. खट्टर हे देशातून बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली असून इमिग्रेशन ब्युरोला पाठविली आहे. तसेच वास्कोच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गौतम खट्टरविऊद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे गौतम खट्टर यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. देशातील विविध ठिकाणी गुन्हा शाखेची पोलिस पथके गौतम खट्टर यांच्या शोधात गेली होती.
माधव खट्टर पोलिस कोठडीत
दरम्यान गौतम खट्टर यांचे भाऊ माधव खट्टर यांना हरिद्वारमधून अटक केल्यानंतर गोव्यात आणून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, माधव खट्टर हे वास्को येथील कार्यक्रमासाठी गौतमसोबत होते. तसेच, गौतम खट्टरनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा व्हिडिओ त्यांनीच रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता. याशिवाय अन्य कारणांमुळे माधव खट्टर या गुह्यात सहभागी असल्याचे तपासात उघड झाल्याने त्यांना सह-आरोपी बनवण्यात आले आहे.