हिमाचल उत्तर प्रदेशच्याच पावलांवर
खाद्यपेय विक्री केंद्रांसंबंधात केले कठोर नियम
वृत्तसंस्था / शिमला
खाद्यपेयगृहांसंबंधांमध्ये आता उत्तर प्रदेश पाठोपाठ हिमाचल प्रदेशातही कठोर नियम लागू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. पारदर्शित्व, सार्वजनिक सुरक्षा आणि वैद्यकीय सुरक्षा लक्षात घेऊन खाद्यपेयगृहांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. ती बुधवारपासून क्रियान्वित करण्यात आली आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या खाद्यपेयगृहांनाही आपल्या विक्री केंद्रांच्या दर्शनी भागावर स्पष्ट दिसेल अशाप्रकारे मालक, व्यवस्थापक, भागीदार, चालक आणि संबंधितांची नावे आणि माहिती प्रदर्शित करावी लागणार आहेत.
हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे राज्य आहे. या सरकारमधील मंत्री विक्रमादित्यसिंग यांनी या नियमांसंबंधीची माहिती इंटरनेटवर पोस्ट केली आहे. हा निर्णय सार्वजनिक कामे आणि विकास तसेच महानगरपालिका विभागाच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. तो बुधवारपासून लागू करण्यात आला आहे.
सर्व संबंधितांना सूचना
हिमाचल प्रदेश सरकारने यासंबंधांमधील सूचना सर्व संबंधितांना पाठविल्या आहेत. तसेच मार्गदर्शक तत्त्वे जनतेसाठीही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आपण कोणाच्या केंद्रामध्ये खातपित आहोत आणि कोणाच्या केंद्रांमधून खाद्यपदार्थ आणि पेये विकत घेत आहोत. हे समजून घेणे हा लोकांचा अधिकारच आहे. त्यामुळे हा नियम करण्यात आल्याचे विक्रमादित्य सिंग यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.
कठोर कारवाई करणार
लोकांना विकल्या जाणाऱ्या अन्नात मलमूत्रादी मानवीय टाकावू पदार्थांचे मिश्रण केल्याचे प्रकरण समोर आल्यास हिमाचल प्रदेश सरकार कठोर कारवाई करणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही घटना घडल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशात तर अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर त्वरित अभियोग चालविला जाणार आहे. हिमाचल प्रदेश सरकारनेही उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.