साताऱ्यात रविवारी हिल हाफ मॅरेथॉन
सातारा :
सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. या मॅरेथॉनचे हे 14 वे वर्ष असून या मॅरेथॉनचा प्रारंभ रविवारी सकाळी 6.30 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथून होणार असून, सर्व स्पर्धकांनी पहाटे 5.30 वाजेपर्यंत पोलीस परेड ग्राउंडवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान, अजिंक्यतारा कारखाना स्थळावरील हॉलमध्ये एक्सो झाला.
या मॅरेथॉनचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक असलेले जय बालाजी ग्रुपचे संचालक गौरव जजोदिया, मालाज ग्रुपचे हुसेन माला तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे व सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांनी संयुक्तरीत्या दिली.
या मॅरेथॉनची सुरुवात पोलीस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर पारंगे चौक, पोवई नाका, नगरपरिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर चौक, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या 500 मीटर पुढे जाऊन त्याच मार्गाने परत येऊन पोलीस परेड ग्राउंड येथे मॅरेथॉनची सांगता होईल, अशी माहिती रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे यांनी दिली.
या मॅरेथॉन मार्गावर आठ ठिकाणी मदत केंद्रे उभारली असून त्याचबरोबर चिअरिंग टीम देखील असणार आहेत. बर्फ वितरण आणि टर्न अराउंडची जबाबदारी अनिल नलवडे यांच्याकडे आहे. संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर पाण्याच्या कॅनची जबाबदारी डॉ. सुचित्रा काटे, डॉ. अश्विनी देव व डॉ. रंजिता गोळे यांच्याकडे आहे अशी माहिती सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने संस्थापक संचालक अॅड. कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे आणि सीए विठ्ठल जाधव यांनी दिली. मॅरेथॉन मार्गावर वैद्यकीय टीम मदतीसाठी असणार आहे. तसेच मॅरेथॉन मार्गावर ऑटोमटिक इलेक्ट्रिक डिफ्यब्यूलेटरची व्यवस्था असून, 6 कार्डियाक अॅम्ब्युलन्स, 6 साध्या अॅम्ब्युलन्स, चार टू व्हिलर अॅम्बुलन्स त्याचबरोबर मशीनदेखील तैनात करण्यात आल्या असून प्रत्येक अॅम्बुलन्सबरोबर एक फिजिशिअन व दोन डॉक्टर्स असणार आहेत.
मॅरेथॉन मार्गावरील खड्डे मुजवणे, रस्त्यांची डागडुजी व स्वच्छतेची जबाबदारी सातारा नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे.
संपूर्ण देशभरात नावाजलेल्या गेलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रशासन, पोलीस वाहतूक नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपरिषद, जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा वन विभाग आणि एस.टी महामंडळ इत्यादी यांनी प्रशासकीय सेवांची बांधणी केली आहे.
स्पर्धकांसाठी साताऱ्यातील सर्व हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग फूल झाले असून विविध मंगल कार्यालयामध्येही स्पर्धकांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्यास सातारकरांनी पाहुण्या स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था आपल्याकडे करावी असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
त्याचबरोबर सातारकरांनी स्पर्धा मार्गावर असणारी आपली वाहने स्पर्धेदिवशी सकाळी 10 वाजेपर्यत इतर ठिकाणी लावून आम्हाला तसेच पोलिस विभागाला सहकार्य करावे ही विनंती संयोजन समितीचे वतीने करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात दाखल होणाऱ्या आपल्या पाहुण्यांना सातारकरांनी प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांना मदत करून ऐतिहासिक सातारा नगरीचा लौकिक वाढवण्यामध्ये सातारा रनर्स फौंडेशनच्या सर्व संचालकांच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे व सचिव श्री शैलेश ढवळीकर यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सकाळी 8.30 वाजता होणार असून, समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे हे उपस्थित रहाणार आहेत.