For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये पावसामुळे महामार्ग पाण्याखाली

06:43 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये पावसामुळे महामार्ग पाण्याखाली
Advertisement

मध्य प्रदेश, बिहारमध्येही पाऊस : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये गारपीट

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने कांकेर जिह्यातील चरमा येथील राष्ट्रीय महामार्ग 30 वर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. तसेच मनेंद्रगड जिह्यातील जनकपूरमध्ये घरांमध्ये पावसाचे पाणी भरले होते. पेंड्रामध्ये वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या पावसामुळे उत्तर प्रदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली आल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. दुसरीकडे, बिहार आणि मध्य प्रदेशातही पावसाचा जोर कायम आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासांत 89.7 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा 182 टक्के जास्त आहे. राज्यात 7 मे पर्यंत मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहील, असा अंदाज आहे. याचदरम्यान मध्य प्रदेशातील 28 जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

हवामान खात्याकडून उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील काही दिवस भारतीय हवामानासाठी बरेच अस्थिर ठरू शकतात. अरबी समुद्रात मान्सूनपूर्व चक्रीवादळाची चिन्हे दिसत असताना पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांपासून मिळालेल्या दिलासानंतर उत्तर भारतात उष्णतेचा नवा टप्पा सुरू होणार आहे. देशाच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. परंतु 10 मे नंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. हवामानविषयक आणि ऐतिहासिक माहितीच्या विश्लेषणानुसार, 10 मे च्या सुमारास आग्नेय अरबी समुद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशात एक चक्रीवादळ प्रणाली तयार होऊ शकते. यामुळे पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. साधारणपणे, एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रात वादळांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे जर ही प्रणाली अधिक तीव्र झाली, तर तो एक अपवाद मानला जाईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.