For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान

05:19 PM May 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान
Advertisement

महामार्ग प्रशासन, ठेकेदाराचा हलगर्जीपणा ; पावशी ग्रामस्थांचा आरोप

Advertisement

कुडाळ -

मुंबई - गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी ते मिटक्याचीवाडी दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे.त्यासाठी जास्त उंचीचा भराव टाकण्यात आला.मात्र संरक्षक भित नसल्याने अवकाळी पावसाचे पाणी वाहून तेथील घरामध्ये चिखलाचे पाणी शिरले. महामार्ग प्रशासन व संबंधित ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा फटका तेथील ग्रामस्थांना बसला आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी,अशी मागणी पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली व ग्रामस्थांनी केली आहे. सर्व्हिस मार्गांच्या कामामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली असून अपघात झाल्यास सर्वस्वी महामार्ग प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहील,असा इशाराही दिला आहे. पावशी बोरभाटवाडी येथे सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे.त्यासाठी जास्त उंचीला भराव टाकण्यात आला.मात्र, संरक्षक भित नसल्याने पहिल्याच मुसळधार पावसाचे पाणी वाहून तेथील महेश पाताडे यांच्या घरात शिरले.मातीचा भराव असल्याने सदर चिखलाचे पाणी त्यांच्या घरात शिरून नाल्याचे स्वरूप निर्माण झाले होते.पाण्याच्या प्रवाहाबरोबर मातीही वाहून घरात गेली. त्याच्या घरातील सामानाची नासधूस झाली. तेथील तुळसकर, पावसकर, पाटील, राणे यांच्या घरापर्यंत सदर पाणी शिरले होते. या अचानक उद्भवलेल्या समस्येमुळे तेथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. महामार्ग प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाचा फटका तेथील पाताडे व अन्य कुटुंबांना बसला.सर्व्हिस मार्गांच्या कामामुळे ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेले चार दिवस अवकाळी पाऊस कोसळून पाण्यासह माती व चिखल तेथील ग्रामस्थांच्या घरात शिरला. तेथील पाय वाटेवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे ये - जा करताना कसरत करावी लागत आहे. याला जबाबदार सर्वस्वी ठेकेदार आहे वेळोवेळी सांगुन सुध्दा हे काम मंद गतीने सुरू ठेवले आणि संपुर्ण बोरभाट तसेच मिटक्याचीवाडी फाटा अशा दोन्ही बाजूला सर्विस मार्ग धोकादायक बनला आहे.काही अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी हायवे प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराची राहील. सर्विस मार्गाचे काम सुरू केल्यापासून चार ते पाच अपघात झाले आहेत. यापुढे अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी हायवे प्रशासन विभाग आणि संबंधित ठेकेदाराची राहील,असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरून घरातील सर्व वस्तूंचे नुकसान झाले.या सर्व गोष्टींचा विचार करता संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रशासनावर अंकुश नसल्याने ही वस्तुस्थिती निर्माण झाली.याचा विचार करून संबंधित ग्रामस्थांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पावशीचे उपसरपंच लक्ष्मीकांत तेली , ग्रामपंचायत सदस्य वसंत भोगटे, गणेश पावसकर ,सौ , निकीता शेलटे सौ, दिव्या खोत ,सौ दिव्या दळवी तसेच ग्रामस्थानी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.