Kolhapur Crime : कोल्हापुरात गोवा बनावट मद्याची तस्करी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांना अटक
७ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : गोवा बनावटीच्या मद्याची अलिशान कारमधून तस्करी करणाऱ्या दोघा उच्च शिक्षीत भावांना स्थानिक गुन्हे व अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून ५१ हजार रुपयांच्या मद्यासह कार असा सुमारे ७ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुभम शिवकुमार साळुंखे (वय २८), आशितोष हिंदुराव साळुंखे (वय २७ दोघेही रा. जाधवनगर आंधळी पलूस जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी जुना वाशीनाका येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारुची कोल्हापूर मार्गे सांगली येथे तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नवीन वाशीनाका येथे शनिवारी सायंकाळी सापळा रचला. एक अलिशान कार भोगावतीकडून भरधाव वेगाने येत असल्याचे दिसून आले. पथकाने हे दोघे भाऊ उच्चशिक्षित शुभम साळुंखे, आशितोष साळुंखे हे दोघे चुलत भाऊ आहेत. या दोघांचेही नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे. बीएससी या दोघांनी पूर्ण केली असून, झटपट पैसे कमाविण्याच्या नादात या दोघांनी गोवा बनावटीच्या मद्याच्या तस्करीचा मार्ग अवलंबला.
वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार योगेश गोसावी, प्रदीप पाटील, गजानन गुरव, वैभव पाटील, विजय इंगळे, शिवानंद स्वामी यांनी ही कारवाई केली.