जुलैमध्ये सर्वांधिक ट्रॅक्टर विक्रीची नोंद
खरीप पेरणी आणि सरकारी योजनांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
खरीप पेरणी आणि सरकारी योजनांचा प्रभावामुळे जुलैमध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर विक्रीची नोंद करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (फाडा) आकडेवारीनुसार, जुलैमध्ये ट्रॅक्टरची नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत 28.1 टक्क्यांनी वाढून 1,17,349 वर पोहचली आहे.
आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या चार महिन्यांत, ट्रॅक्टरच्या किरकोळ विक्रीत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारी उपाययोजनांमुळे कृषी क्षेत्रातील रोख रकमेचा प्रवाह सुधारला. तसेच, सामान्यपेक्षा कमी पावसाच्या भीतीदरम्यान खरीप पेरणीत झालेल्या पावसानेही या वाढीला हातभार लावला.
फाडाच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये ट्रॅक्टरची नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत 28.1 टक्क्यांनी वाढून 1,17,349 झाली. या महिन्यासाठी ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. जूनच्या तुलनेत किरकोळ विक्रीत 12.1 टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल-जुलै कालावधीत किरकोळ विक्री 24.77 टक्क्यांनी वाढून 3,86,648 झाली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 3,09,896 होती.
एप्रिलमध्ये 23.22 टक्के, मेमध्ये 11.17 टक्के आणि जूनमध्ये 25.31 टक्के वाढ झाल्यानंतर जुलैमध्ये ही कामगिरी झाली आहे. एप्रिलमध्ये सर्व वाहन श्रेणींमध्ये ट्रॅक्टरची विक्री सर्वाधिक राहिली.
महिंद्राची कामगिरी
जूनमध्ये त्याने दुसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि जुलैमध्ये आतापर्यंतचा उच्चांक गाठला. हाच कल उत्पादकांच्या घाऊक विक्रीच्या आकडेवारीतही दिसून आला. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री जुलैमध्ये वार्षिक तुलनेत 21 टक्क्यांनी वाढून 32,643 युनिट्सवर पोहोचली. एप्रिल-जुलै दरम्यानची एकूण देशांतर्गत विक्री 19 टक्क्यांनी वाढून 1,85,069 झाली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 1,56,189 होती.
सोनालिकाची सर्वोत्तम कामगिरी
सोनालिका ट्रॅक्टर्सने जुलैमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि 11,442 ट्रॅक्टर्सची विक्री केली. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 27.2 टक्क्यांनी वाढ झाली. सोनालिका ट्रॅक्टर्सची निर्मिती करणाऱ्या इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, ‘आमची 27.2 टक्क्यांची देशांतर्गत वाढ ही उद्योगातील सर्वाधिक आहे आणि आम्हाला अभिमान आहे की यामुळे आम्ही या क्षेत्रातील सर्वाधिक बाजारहिस्सा असलेली कंपनी बनलो आहोत.’