सर्वात उंच चिनाब सेतूचे आज उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार कार्यक्रम
वृत्तसंस्था/श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण करण्यात आलेल्या चिनाब सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शुक्रवार, 6 जूनला केले जाणार आहे. हा सेतू अभियांत्रिकी चमत्कार म्हणून प्रसिद्धीस पावलेला असून जगातील सर्वात उंच सेतू होण्याचा सन्मान त्याने प्राप्त केला आहे. या सेतूचे नागरी आणि सामरिक अशा दोन्ही प्रकारचे महत्व असून भारताच्या देशव्यापी पायाभूत सुविधा कार्यक्रमाचा तो एक महत्वाचा भाग आहे. या चिनाब सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये जाणार असल्याने ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काश्मीर दौऱ्यादरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन विशेष वंदे भारत रेल्वेगाड्यांचा शुभारंभही केला जाणार आहे. या गाड्या जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि जम्मूतील कातरा यांना जोडणार आहेत. चिनाब सेतूचे उद्घाटन एप्रिलमध्ये केले जाणार होते. तथापि, प्रतिकूल हवामानामुळे तो कार्यक्रम स्थगित करावा लागला होता. तो आता 6 जूनला होणार आहे, अशी माहिती दिली गेली.