मुंबईत बाहेरील आंब्याची आवक अधिक
रत्नागिरी :
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात कोकणातून 9 हजार 423 क्विंटल आंबा दाखल झाला तर अन्य ठिकाणाहून 9 हजार 883 क्विंटल आंबा 8 एप्रिल रोजी दाखल झाला. मद्रास व अन्य ठिकाणच्या आंबा आवकीमध्ये कोकणापेक्षा मोठी वाढ झाल्याने कोकणी आंब्याचा भाव घसरेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
बुधवारी देवगड आणि रत्नागिरी हापूस 40 ते 50 हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला. मद्रास हापूस 20 ते 30 हजार रुपये क्विंटल दराने घेतला गेला. बदामी आंब्याला केवळ 10 ते 15 हजार रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला.
सध्या वेंगुर्ले, मालवण, देवगड, राजापूर, रत्नागिरी, गुहागर परिसरातून चांगल्या प्रमाणात आंबा मुंबई बाजाराकडे रवाना होत आहे. कोकणातील आंब्यापेक्षा मद्रास, बदामी आदी आंबा मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. 8 एप्रिल रोजी कोकणातील आंब्यापेक्षा मद्रास व बाहेरचा आंबा अधिक प्रमाणात दाखल झाला. यामुळे कोकणातील आंब्याचा भाव जलदगतीने घसरेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.