Ichalkaranji Politics | इचलकरंजीत स्वीकृत नगरसेवक निवडीवर भाजपमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकृत पदांवर चर्चा
इचलकरंजी - महापालिकेतील भाजपच्या स्वीकृत नगरसेवक नाव निश्चितीसाठी मुंबईत बैठक आयोजित केली असून यामध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह आमदार व माजी आमदारांची उपस्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवड नुकतीच पार पडली असून महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असून यासाठी भाजपचे गटनेते विठ्ठल चोपडे यांनी सोमवारी (दि. १६) उमेदवारी अर्ज घेतला आहे.
दरम्यान, महापालिकेत भाजपचे ६५ पैकी ४३ नगरसेवक निवडून आले असून त्यांना चार स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. पण महानगरपालिका निवडणुकीदरम्यान वाढत चाललेली उमेदवारीची मागणी तसेच बंडखोरी टाळण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द दिला आहे. आता दोन दिवसांत स्वीकृत नगरसेवक पदाची निवड होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मुंबईत भाजपच्या स्वीकृत नगरसेवक पदाचे नाव निश्चित करण्यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १७) मुंबईत बैठक होणार आहे. आमदार राहुल आवाडे हे सध्या मुंबईत आहेत. सोमवारी रात्री माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर हे सुद्धा मुंबईसाठी रवाना झाले आहेत.